शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले असून दि. २७ रोजी जुन्नर शिवनेरी येथून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली.
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघत आहे. शिरूर तालुक्यात या यात्रेचे आगमन होताना त्याची सुरुवात वढू येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन करण्यात आली.
स्थानिक शेतकर्यांशी संवाद साधत शिक्रापूर येथे या यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे स्वतः ट्रॅक्टर चालवत होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, “केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकर्यांसह सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले असून, त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच या आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.
जनतेच्या मनातील हा आक्रोश येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.
तर यावेळी आमदार अशोक पवार म्हणाले, “केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी ताबडतोब उठवावी, खासगी व सरकारी असा भेदभाव न करता दूध उत्पादकांना अनुदान मिळावे, बिबट्याप्रवण क्षेत्रात शेतीला दिवसा अखंड वीजपुरवठा करावा, पीकविमा ताबडतोब मिळावा, सरसकट कर्जमाफी देऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा, तसेच शेतकर्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जासाठी धोरण राबवावे, अशा मागण्या अशोक पवार यांनी केल्या.