रस्ते अपघातांवर नियंत्रणाचा प्रयत्न सुरू, पण परिणाम उलट: परदेशातील परिषदेत तोंड लपवतो – नितीन गडकरी

Photo of author

By Sandhya

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, भारतात दरवर्षी १.७८ लाख नागरिक रस्ते अपघातांमध्ये प्राण गमावतात. या आकडेवारीने भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा मलिन होत असून, जागतिक परिषदांमध्ये चर्चा करताना तोंड लपवावे लागते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

गडकरी यांनी अपघातांच्या आकडेवारीवर प्रकाश टाकत नीती आयोगाच्या अहवालानुसार ३० टक्के मृत्यू केवळ जीवरक्षक उपचारांच्या अभावामुळे होतात, असे सांगितले. त्यांनी विशेषतः वाहन चालक परवाना जारी करण्याच्या प्रक्रियेत तातडीने सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी हेही नमूद केले की भारतात वाहन परवाना मिळवणे अतिशय सोपे असून, त्यावर कठोर नियंत्रण असणे गरजेचे आहे.

अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ६० टक्के मृत्यू हे १८ ते ३४ वयोगटातील तरुणांचे आहेत. अपघातांमुळे देशात वर्षानुवर्षे महत्त्वाच्या मानव संसाधनाची हानी होत आहे. त्यांनी सांगितले की, रस्ते अपघातांमध्ये जेवढे मृत्यू होतात, तेवढे मृत्यू ना युद्धांमध्ये होतात ना दंगलीत. यामुळे समाजामध्ये जागरूकता वाढवून वर्तन सुधारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

ओव्हरलोड वाहतूक, नियमभंग, आणि वाहतुकीतील हलगर्जीपणामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी कठोर कायद्यांची अंमलबजावणी आणि समाजाच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यापक दृष्टीकोन स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave a Comment