एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातातील बाहुले ; पृथ्वीराज चव्हाण

Photo of author

By Sandhya

एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस हातातील बाहुले ; पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र राज्यातील सर्व निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात. एकनाथ शिंदे हे फक्‍त नावापुरते मुख्यमंत्री आहेत. फडणवीस सांगतील तसे वागावे लागते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातातील बाहुले आहे, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

कॉंग्रेसतर्फे दहिवडी येथे आयोजित माढा लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कसबा (पुणे) मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी,

आयोजक रणजितसिंह देशमुख, सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील, सुरेश चव्हाण, विश्‍वंभर बाबर, श्रीरंग चव्हाण, उदयसिंह पाटील, राजेंद्र शेलार, भानुदास माळी, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पना यादव, जाकीर पठाण, जगन्नाथ कुंभार, अमरजीत कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. चव्हाण पुढे म्हणाले, की देशातील आणि राज्यातील वातावरण बदलेले आहे. विश्‍वासू आणि सामान्य जनतेचा पक्ष म्हणून कॉंग्रेसकडेच जनता पाहत आहे. येणारा पुढील खासदार हा कॉंग्रेस पक्षाचा असेल. भारतीय जनता पक्ष जाती- जातीमध्ये दंगली घडवण्याचे काम करतो. कोणीतरी मनोहर भिडे येतो आणि वादग्रस्त वक्तव्य करून जातो.

दंगली घडवितो. या सर्व प्रकारला भारतीय जनता पक्ष पाठीशी घालत आहे. या देशात पुन्हा जर भारतीय जनता पक्षाचे सरकार आले तर लोकशाही राहणार नाही. अर्थव्यवस्था पुर्णपणे ढासळलेली आहे. सत्तर वर्षात जेवढे कर्ज झाले नव्हते, तेवढे कर्ज मोदी सरकारने काढले आहे. या सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला.

कॉंग्रेसच्या काळात शेतकरी सुखी होता. व्यावसायिकांवर अन्याय केला. जीएसटीत जाचक अटी लादल्या. या सरकारच्या काळात महिलांवर – दलितांवर अत्याचार, महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मतदान करून देशाच्या आणि स्वतःच्या नुकसानीस जबाबदार होऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

मोहन जोशी म्हणाले, राष्ट्रवादी, शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटले. पण, जनतेचा कॉंग्रेस पक्षावर विश्‍वास आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला चांगले दिवस येतील. माढा लोकसभा मतदारसंघात आपली ताकद जास्त असल्याने पुढील खासदार कॉंग्रेसच्या विचाराचा असेल.

करोडो रुपये खर्च करूनही कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर मोठ्या मताधिक्‍याने निवडून आले. पृथ्वीराज बाबांमुळे येथील आमदार घडला. पाणी आणण्यामध्ये बाबांचा मोठा हात आहे. तरीही स्थानिक आमदार बाबांचा काही संबंध नाही, असे म्हणत फिरत आहे. येत्या निवडणुकीत त्याची जागा त्याला दाखवून द्या, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जयकुमार गोरे खलनायक..! माण तालुक्‍याचे आमदार जयकुमार गोरे हे जलनायक नसून खलनायक आहेत. पृथ्वीराज बाबांमुळे माण, खटावला पाणी आले आहे. परंतु येथील आमदार देवेंद्र फडणवीसांमुळे पाणी आल्याचे सांगत फिरत आहेत.

युवकांना रोजगार मिळावा म्हणून साखर कारखान्याचे नियोजन केले तर लगेच येथील आमदार आडवा पडला. महादेव जानकरांनी चारा छावणी सुरु करण्यासाठी आवाज उठवला आणि अंमलबजावणी झाली.

परंतु छावणी चालकांची बिले रखडविण्याचे काम माणच्या बहाद्दराने केले. पण, बोराटवाडीच्या गड्याने पिठाची गिरणी तरी उभा केलीय का? लोकांची दिशाभूल करून मतदारसंघात नारळ फोडायचे काम बंद करा, असा घणाघात रणजितसिंह देशमुख यांनी केला.

Leave a Comment