धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. धनगर समाजाकडून राज्यातील अनेक भागामध्ये रास्ता रोको करण्यात आले. यामुळे पुणे, सातारा, पंढरपूर मार्ग हा दोन तासांपेक्षा अधिक काळ बंद ठेवण्यात आला होता. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर आंदोलन करतांना दिसले.
अशात जालना येथील धनगर आरक्षणाप्रकरणी झालेल्या कारवाईची धग आता थेट मंत्रालयापर्यंत पोहचली आहे. दरम्यान, धनगर आंदोलनकर्त्यांच्या भावना न समजून घेताच त्यांच्यावर गुन्हे नोंदवल्याने आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहे.
गोपीचंद पडळकर यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्याय देण्याची मागणी करत अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी लावून धरली आहे.
माध्यमांशी बोलतांना गोपीचंद पडळकर म्हणाले,’या तडफोडीची पोलिस प्रशासनाने दखल घेतली.प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चूक केल्याचा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला.’ जालना जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांना निवेदन देण्याच्या एक दिवस अगोदर कल्पना देण्यात आली होती.
पण त्यांनी आंदोलकांना प्रतिसाद दिला नाही. आता पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी 36 जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पडळकर नाराज झाले. त्यांनी याप्रकरणी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.याप्रकरणात 36 जणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी पडळकर यांनी केली आहे.