काहींना सत्तेमुळे शहाणपण सुचतं, काँग्रेसकडून आमदार होईपर्यंत हुकूमशाही दिसली नाही. आता शिंदे गटातर्फे लोकसभा उमेदवारी गळ्यात पडल्यावर काँग्रेसची हुकूमशाही दिसत आहे.
मात्र, जोरात ओरडला म्हणून घोडा कुणीही होऊ शकत नाही. भाजपची स्थिती दयनीय आहे. उमेदवार इतर पक्षातून पळवावे लागत आहेत असे टीकास्त्र विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना सोडले.
काँग्रेसचा राजीनामा देत महायुतीत गेलेल्या माजी आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसमध्ये हुकूमशाही, झुंडशाही असल्यामुळे आपण पक्ष सोडल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात विजय वडेट्टीवार बोलत होते.
विदर्भ हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे. पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर मतदारसंघासोबत पाचही जागी आम्हीच जिंकू असा दावा केला. विदर्भातील जनतेने संकटकाळातही काँग्रेसला साथ दिली आहे. मी केवळ एका जिल्ह्यातील नेता नाही, त्यामुळे पाचही ठिकाणी मी जाणार आहे.
मला जिथे जाता येईल तिथे जाईल, चंद्रपूरबाबत पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करतो. उद्या मंगळवारी काँगेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचा फॉर्म भरण्यासाठी मी जाणार आहे. यानंतर गडचिरोली करून चंद्रपूरला जाईल. गरज असेल तिथे मी जाईल, तसेच त्यांनी महाराष्ट्राचा नेता आहे यावरही भर दिला.
चंद्रपूरच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली ते स्थानिक पातळीवर सर्वांची नावे घेतली. पण, वडेट्टीवार यांचे नाव टाळले याबाबतीत छेडले असता नावाचे काही मोठे नाही, धावपळीत त्या विसरल्या असतील. व्यक्ती नव्हे पक्ष मोठा असतो, याच न्यायाने मागील निवडणूक आम्ही जिंकलो असे स्पष्ट केले.