मराठा समाजातील शेवटच्या माणसापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही. मराठा आंदोलन थांबवण्यासाठी शासनाने अनेक डाव टाकले, परंतु मराठ्यांच्या एकजुटी पुढे शासनाला माघार घ्यावी लागली.
आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून मराठ्यांना अंगावर घेऊ नका, अन्यथा तुमचा सुपडा साप होऊन जाताल असा गर्भित इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्र्यांना उद्देशून दिला.
कोणत्याही चौकशीला तसेच खोट्या गुन्ह्याला घाबरत नाही. जेलमध्ये जाईन, पण मराठ्यांना न्याय मिळवून देईल, असेही ते म्हणाले. वांबोरी येथे शनिवारी सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना संबोधित करताना जरांगे पाटील बोलत होते. मी मराठा जाती शिवाय कोणाला मोठा मानत नाही.
माझा समाज हिच माझी संपत्ती आहे, तेच माझे दैवत आहे. माझी बदनामी करून मराठा आंदोलन मोडीत काढण्याचा डाव राज्य सरकार करत आहे. माझ्यावर लावलेली एसआयटी चौकशी त्याचबरोबर दाखल केलेले खोट्या गुन्ह्यांना मी घाबरत नाही.
मराठा समाजासाठी मी जेलमध्ये जाईल परंतु मराठ्यांना न्याय मिळवून देईल अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली. दहा टक्के न टिकणारे आरक्षण देऊन मराठ्यांना झुलवत ठेवण्याचा राज्य शासनाचा डाव मी ओळखला असून सगे सोयर्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होत नाही, तोपर्यंत व मी स्वस्त बसणार नाही.
हक्काचे आरक्षणासाठी मराठ्यांनी एकत्र येऊन अधिक तीव्र लढा देण्याची गरज असल्याचे यावेळी जरांगे म्हणाले. याप्रसंगी वांबोरी परिसरासह तालुक्यातून व जिल्ह्यातून सकल मराठा समाजाचे हजारो बांधव उपस्थित होते.
मुस्लिम बांधवांचे सरबत वांबोरीतील मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यातील उपवास सुरू असतानाही बैठकीसाठी आलेल्या मराठा बांधवांना थंडगार सरबताचे आयोजन केले होते. आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच मुस्लिम बांधवांनी घडवलेले सामाजिक एकतेचे दर्शन हा परिसरात चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय म्हणून चर्चिला गेला. यातून सर्व समाजामध्ये एकतेची भावना वृद्धिंगत झाल्याची चर्चा होती.