






बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क येथे महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
“प्रोजेक्ट SAVE” अंतर्गत गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क येथे आज महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील उपक्रम राबविण्यात आला. युनियन बँक, मा. सुनेत्रा वाहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सहकार्याने आणि विश्वनाथ कॅन्सर केअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित “प्रोजेक्ट SAVE” अंतर्गत गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंध व जनजागृती अभियानाची प्रभावी सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत टेक्सटाईल पार्कमधील तब्बल १२०० महिलांची HPV DNA चाचणी करण्यात येणार असून, महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आज पहिल्या टप्प्यात कॉटन किंग कंपनीमध्ये विशेष प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उद्यापासून दुसऱ्या टप्प्यात टेक्सटाइल पार्क मधील सर्वच कंपन्यांमध्ये सुरू राहील.
या वेळी कंपनीतील महिला व पुरुष कामगारांना एकत्रित करून कॅन्सर प्रिव्हेन्टिव्ह केअर, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, नियमित तपासणीचे महत्त्व आणि HPV DNA चाचणीची माहिती अत्यंत सविस्तरपणे देण्यात आली. हेमलता तिवारी आणि डॉ. सोमिता यांनी अत्यंत समर्पक व संवेदनशील पद्धतीने मार्गदर्शन करत महिलांमध्ये आरोग्याबाबत आत्मविश्वास आणि जागरूकता निर्माण केली.
या उपक्रमात महिलांच्या मनातील भीती दूर करत, “वेळीच तपासणी म्हणजे सुरक्षित आयुष्य” हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. अनेक महिला कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम आपल्या आरोग्यासाठी आश्वासक आणि कुटुंबासाठी सुरक्षित भविष्य देणारा असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी श्री. कौशिक मराठे साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
“महिलांचे आरोग्य हे कुटुंबाच्या आणि समाजाच्या सुदृढ भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार या टेक्सटाईल पार्कमधील प्रत्येक कुटुंबाकडे आपुलकीने आणि कुटुंबप्रमुखाप्रमाणे लक्ष देतात. महिलांच्या आरोग्यासाठी असा संवेदनशील उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.”
या कार्यक्रमास टेक्सटाईल पार्कमधील सर्व मेंबर कंपन्यांचे महिला लीड (HR) प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच श्री. कौशिक मराठे साहेब, श्री. गायकवाड, श्री. सुनील पाटील, श्री. अडवाणी, श्री. कल्पेश जी, श्री. संतोष, श्री. प्रवीण, श्री. कुलदीप, श्री.विजय कोकाटे आणि सौ.सोनाली ताई यांची विशेष उपस्थिती.
महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी आणि भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्कमध्ये सुरू झालेला हा उपक्रम निश्चितच एक प्रेरणादायी आणि समाजोपयोगी पाऊल ठरत आहे.