मुंबईत होणारी विरोधकांची बैठक हा केवळ मीडिया इव्हेंट असून आम्ही त्याकडे केवळ बघत आहोत, फारशी दखल घेण्याची गरज नाही.
कारण, इंडिया आघाडीला ना पंतप्रधानपदाचा कुणी नेता, ना कुठला ही अजेंडा असून ते फक्त मोदींना हटविण्याच्या एकमेव अजेंड्यासाठी एकत्र आले आहेत.
मात्र, आपल्या कर्तृत्वाने मोदींनी जनतेच्या मनात नाव कमावले आहे यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला. एका कार्यक्रमासाठी आले असता ते विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, इंडिया मध्ये 36 नाही 100 ही पार्ट्या आल्या तरीही ते मोदींना लोकांच्या मनातून काढू शकत नाहीत. पाच पक्षांनी आतापासूनच पंतप्रधान पदावर दावा ठोकला आहे.
जे पक्ष एकत्र आले आहेत ते देश हितासाठी नव्हे तर सध्याच्या राजकारणात स्वतःची दुकानं वाचवण्यासाठी एकत्रित आलेल्या आहेत.हे पक्ष आज आणि उद्या देखील पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवू शकत नाहीत हे जनतेला ठाऊक असल्याने जनता पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याच पाठीशी राहणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.