मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ चेहरा, खरे मुख्यमंत्री “सुपर सीएम’ हे देवेंद्र फडणवीसच ; नाना पटोले

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

राज्यातील तिघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध आहे हे स्पष्ट झाले आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकारपदावरून स्पर्धा सुरू आहे.

अजित पवार यांच्या दादागिरीचा अनुभव मविआ सरकारने पाहिला आहे, पण सध्या त्यांच्या दादागिरीला चाप लावला आहे. राज्यातील सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ चेहरा आहेत आणि खरे मुख्यमंत्री “सुपर सीएम’ हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असा टोला कॉंग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगाविला.

टिळक भवन येथे नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील तिघाडी सरकारमध्ये मलईसाठी भांडणे सुरू आहेत. राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, पिण्याचे पाणी नाही, चारा नाही, त्याकडे सरकारचे लक्ष नाही आणि तिन्ही पक्षात खुर्चीच्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे.

दोन दिवसापूर्वी मंत्रालयात शेतकऱ्यांनी जीवावर उदार होऊन आंदोलन करत सरकारकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला, पण या सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही.

सरकार स्थापन होऊन दीड वर्ष होत आहे, पण अजून जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत, मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाहीत. महाराष्ट्र झपाट्याने पिछाडीवर जात असताना सरकारमधील मंत्री मात्र खोटे आकडे दाखवत जनतेची फसवणूक करत आहेत, असा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

Leave a Comment