जरांगे-पाटील : ५४ लाख मराठ्यांना पहिले प्रमाणपत्र द्या…

Photo of author

By Sandhya

जरांगे-पाटील

अंतरवाली सराटीमधून २० जानेवारीरोजी मुंबईच्या दिशेने कूच करणारच, असा ठाम निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. आरक्षण मिळाले तर गुलाल घेऊन जाऊ.

नाही मिळाले तर आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईला जाऊ. आता माघार नाही, असा पवित्रा जरांगे यांनी व्यक्त केला. ते अंतरवाली सराटीत आज (दि.१७) पत्रकारांशी बोलत होते. ज्या व्यक्तीची नोंद सापडली आहे. त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना जिथे जिथे आपली सोयरीक जुळते. त्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावीत.

आपण परंपरेनुसार लग्नाची सोयरीक करतो, जिथे जिथे लग्नाचे संबंध जुळतात. त्या सर्व सोयऱ्यांना ज्याची नोंद सापडल्या आहेत. त्याच बांधवांच्या नोंदीच्या आधारे त्यांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ देण्यात यावा. ही व्याख्या त्या अध्यादेशात घेणे आवश्यक आहे.

ती व्याख्या मी त्यांना दोन महिन्यापूर्वी दिली होती. परंतु, या अध्यादेशाच्या मसुद्यामध्ये ती दुरुस्ती केलेली नसल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगितले. ज्यांचे पुरावे सापडले, त्या ५४ लाख मराठ्यांना पहिले प्रमाणपत्र द्या. सगे सोयऱ्यांची व्याख्या दुरुस्त करा, अशी मागणी त्यांनी केली.

राम मंदिर… मुंबई आरक्षण मोर्चा आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा एकच वेळी येतोय, त्यामुळे प्रचंड गर्दी आणि प्रशासनावर येणारा ताण याबाबत आपल्याला काय वाटतं या प्रश्नावर मनोज जरांगे म्हणाले की, हा सोहळा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. आणि आम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या राम राम म्हणून दिवसाची सुरुवात करतोय.

श्रध्देची भावना मनात असली पाहिजे. तो सोहळा आनंदाचा आहे. आंदोलन हे नियोजित असल्यामुळे आम्ही आमच्या तारखाप्रमाणे काम करतोय. सोहळा आनंदाचा आहे. त्यात दुमत नाही. त्यात राजकारण वगैरे काही नाही. आम्हीही तो सोहळा रस्त्याने साजरा करू, असे जरांगे पाटील म्हणाले.

पंतप्रधानांकडून आम्हाला अपेक्षा नाहीत पंतप्रधान मोदी १९ जानेवारीला महाराष्ट्रात येत आहेत. या प्रश्नावर जरांगे म्हणाले की, पंतप्रधान महाराष्ट्रात दोनदा आले. परंतु, त्यांनी राज्य सरकारला कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. ते मराठा आरक्षणाबाबत आणि सर्वसामान्यांच्या बाजूने बोलले नाहीत. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा नाहीत.

मोदी सामान्याच्या बाजूने बोलणार नाहीत. त्यांना सर्वसामान्याची जाण आणि गरज राहिली नाही. त्यांच्याकडून अपेक्षा करण्याची काही गरज नाही. आमच्या मनगटात बळ आहे. त्या मनगटाच्या बळावर आम्ही ते मिळवणारच आहोत. आता हात कुणाच्या समोर पसरविणार नाही.

Leave a Comment