मराठा आरक्षणाचा निर्णय दिलेल्या मुदतीत न झाल्यास काय करावयाचे याबाबत येत्या 23 डिसेंबर रोजी बीड येथील सभेत पुढील घोषणा करण्यात येईल, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी जाहीर केले.
आता वेळ वाढवून मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्याची माहिती दिली.
हे मराठ्यांचे यश आहे. आता आम्ही कायद्याच्या चौकटीत बसलो आहोत. त्यामुळे आम्ही ओबीसी आरक्षणात बसल्यामुळे सरकारचा सूर बदलला आहे.
सरकारला आम्ही दिलेला वेळ पुरेसा आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला लिहून दिलेला कागद पुन्हा वाचला तर वेळ वाढवून द्यायची गरजच पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जरांगे यांनी मराठा आरक्षण व आंदोलनाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. ओबीसीतूनच आम्हाला मराठा आरक्षण मिळत आहे, असेही सांगितले.