जयंत पाटील : आत्मविश्वास नसल्यानेच घेतली मनसेची मदत…

Photo of author

By Sandhya

जयंत पाटील

भाजपला मनसेने का पाठिंबा दिला? असा प्रश्न लोकांना पडला आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास नसल्यानेच भाजपला अन्य पक्षांची मदत घेत निवडणुकीला सामोरे जावे लागत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली. जयंत पाटील म्हणाले, भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करण्यात येत आहे.

तरीही त्यांना अन्य पक्षांची गरज का पडते? हा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे विजयी होण्याचा आत्मविश्वास नाही. त्यामुळे त्यांना अन्य पक्षांची मदत घ्यावी लागत आहे, हे स्पष्ट होत आहे.

माढा लोकसभा मतदार संघातील पक्षाचा उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे. योग्य वेळी त्याचे नाव जाहीर केले जाईल. या मतदारसंघात राष्ट्रवादी किंवा मित्रपक्षांचा सक्षम उमेदवार दिला जाईल. महादेव जानकर आमच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीत अन्य मित्रपक्ष सहभागी असल्याने स्वतंत्रपणे जागा घोषित करता येत नाही.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जी जागा मिळेल, त्या जागेवर सक्षम उमेदवार दिला जाईल, असे पाटील यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेले पत्र वाचले आहे. महाविकास आघाडीतील त्यांच्या समावेशाबाबत चर्चाही सुरू आहे. त्यामुळे त्याबाबत जास्त बोलता येणार नाही.

विनाकारण जाहीर विधाने करणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.लंके निवडून येतील आमदार नीलेश लंके यांना तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत, याची दक्षता घ्यावी लागेल. योग्य वेळी सर्व सोपस्कार पूर्ण केले जातील.

नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणुकीसाठी लंके उभे राहिल्यास शंभर टक्के निवडून येतील. त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. नगर दक्षिणमध्ये पक्षाची तुतारी निश्चित वाजेल, असेही पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment