मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाचा प्रश्न सरकारने समन्वयाने योग्य पद्धतीने हाताळणे गरजेचे आहे. दोन समाजामध्ये वाद होणार नाही, सामाजिक समतोल बिघडणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे.
कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. मार्केट यार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार, आमदार व पदाधिकार्यांची शुक्रवारी बैठक झाली.
या बैठकीपूर्वी जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. आरक्षणावरून मराठवाड्यात मराठा व ओबीसी समाजात वाद पेटत असल्याच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, काही जण राजकीय स्वार्थापोटी ठरावीक समाज एका बाजूला नेत आहेत. कोणावर अन्याय होणार नाही, दोन समाजात वाद होणार नाही, हे सरकारने पाहणे गरजेचे आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला समाजातील सर्वच घटकांनी मदत केली आहे. येणारी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितच लढणार आहे. कोण किती जागा लढवणार आहे, हे आताच सांगता येणार नाही.
महाविकास आघाडीची सत्ता आणणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणूक झाल्यावर आघाडीतील सर्व पक्ष एकत्रित घेतील. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी आत्ताच कोणी घाई करू नये, असेही पाटील म्हणाले.
शरद पवार यांनी नव्याने निवडून आलेल्या खासदारांना चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. बारामतीत कुणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय पवार साहेब घेतील. आगामी निवडणुकीत गेलेले किती आमदार आमच्याकडे येणार, याबाबत मला कल्पना नाही. काही आमदार मला फोन करून बोलत आहेत, पण किती येणार याची अद्याप कल्पना नाही.