जेजुरी, दि. ३० तीर्थक्षेत्र जेजुरीच्या पाणीपुरवठ्या संदर्भात जेजुरी औद्योगिक महामंडळाने पाणी उचलण्यास मान्यता दिल्याची माहिती पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी दिली. यासंदर्भात लवकरच करार केला जाऊन शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे जेजुरी शहराची पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.
पूर्णपणे पावसावर अवलंबून असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील धरणे अजूनही पावसाअभावी कोरडीच आहेत. जेजुरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नाझरे जलाशयात पिण्यास उपयुक्त असा पाणीसाठा शिल्लक नसल्याने जेजुरी शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
नुकतीच आमदार संजय जगताप यांनी जेजुरीचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, माजी नगराध्यक्षा सौ वीणा सोनवणे, गटनेते सचिन सोनवणे, उद्योजक रवी जोशी आदींसह औद्योगिक महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे यांच्याशी पुणे येथे नुकतीच बैठक घेतली होती.
बैठकीत जेजुरी औद्योगिक वसाहतीला वीर जलाशयावरून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून दिवसाआड २००० क्युबिक मीटर पाणी मिळावे अशी मागणी केली होती. त्या संदर्भातील येणारे बिल ही जेजुरी नगरपालिका भरण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले होते.
दरम्यान आज औद्योगिक महामंडळाचे मुख्य अधिकारी बिपिन शर्मा यांनी जेजुरी शहराला लागणारा पाणीपुरवठ्यासंदर्भात वीर जलाशयातील पाणी योजनेतून पाणी उचलण्यास मान्यता दिली आहे.
येत्या एक-दोन दिवसात जेजुरी पालिका आणि औद्योगिक महामंडळ यांच्यात या संदर्भातील पाणी करार होऊन शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे जेजुरी शहराच्या पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान वीर जलाशयाखालील मांडकी येथील डोहावरून जेजुरी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईन आळंदी पंढरपूर महामार्गाच्या कामामुळे काढण्यात आली होती.
येत्या पंधरा दिवसांमध्ये तीही पाईपलाईन पूर्णपणे तयार केली जाऊन त्यातूनही शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या मुळे शहराची पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे अशी माहिती जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी दिली.