जिल्ह्यातील 89 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 48 ग्रामपंचायतींच्या 72 रिक्त जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासह जिल्ह्यातील बिद्री, भोगावती आणि आजरा सहकारी साखर कारखाना, महालक्ष्मी आणि वारणा बँक यासह अडीच हजारांवर सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांची जिल्ह्यात दोन-तीन महिने रणधुमाळी सुरू राहणार आहे. यामुळे जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच राजकीय बार उडणार आहेत.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही एकप्रकारे रंगीत तालीम असल्याने नेत्यांचीही मोठी कसोटी लागणार आहे. जून ते डिसेंबरअखेर मुदत संपणार्या जिल्ह्यातील 89 ग्रामपंचायतींसाठी दि. 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
याच दिवशी 48 ग्रामपंचायतींच्या 72 जागांसाठी पोटनिवडणुकांचेही मतदान होणार आहे. त्याची प्रक्रिया दि. 6 पासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील राजकीयद़ृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या गारगोटी, सरवडे, कसबा वाळवे, बाजारभोगाव, वाशी, चिंचवाड आदी महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
ग्रामपंचायतींसह सरपंचही आपल्याच गटाचा व्हावा, याकरिता राजकीय नेत्यांनी आतापासूनच कंबर कसली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांइतक्याच राजकारणात महत्त्वपूर्ण ठरणार्या साखर कारखाना, बँका, दूध संस्था, पतसंस्था आदी सहकारी संस्थांच्याही निवडणुका होत आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना दिलेली स्थगिती निवडणूक प्राधिकरणाने उठवली आहे. ज्या स्तरावर निवडणूक प्रक्रिया थांबली होती, त्या स्तरापासून ती पुढे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यामुळे तीन साखर कारखाने, दोन बँका यासह तब्बल अडीच हजार लहान-मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा ऑक्टोबर-नोव्हेंबर या दोन महिन्यांत उडणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्याचसोबत वर्षभरावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारीही अनेकांनी सुरू केली आहे.
जिल्ह्यात या दोन महिन्यांत होणार्या या निवडणुका अनेकांसाठी रंगीत तालीम ठरणार आहेत. राजकीय पक्षांचा या निवडणुकीत थेट संबंध नसला, तरी स्थानिक पातळीवरील राजकीय गणितांसाठी गटांच्या माध्यमातून अनेक नेते, अप्रत्यक्ष या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.
यामुळे जिल्ह्यात राजकीय धुरळा उडणार आहे. ‘भोगावती’चे काय होणार? भोगावती कारखान्यावर 223 कोटींपर्यंत कर्ज आहे. त्यामुळे निवडणुका नको, असा एक गट म्हणतो आहे; तर दुसरा गट निवडणूक लढविण्यासाठी तयार आहे.
आता छाननीनंतर उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करायची झाल्यास नेत्यांना अनेकांची मनधरणी करावी लागणार आहे.
कारखाना निवडणुका; गावांत टोकाची ईर्ष्या कारखाना निवडणुकांत आतापासूनच टोकाची ईर्ष्या दिसू लागली आहे. बिद्री, भोगावती, आजरा या कारखान्यांच्या निवडणुकांमुळे भुदरगड, कागल, राधानगरी, करवीर, पन्हाळा, आजरा, गडहिंग्लज या सात तालुक्यांत वातावरण ढवळून निघणार आहे.
त्यातच या सात तालुक्यांतील सर्वच गावांतील एक किंवा दोन दूध संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे गावांतील नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.