बंद्यांची सुधारणा व पुनर्वसन यावर भर असल्याने बंद्यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर समाजामध्ये सन्माननीय नागरिक म्हणून पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांना निरनिराळे व्यवसाय व कला यांचे शिक्षण देण्यासाठी कारागृहांमध्ये विविध उद्योग सुरु करण्यात आलेले आहेत.
कारागृहातील सर्व उद्योग वस्तुतः उत्पादन -नि -प्रशिक्षण पद्धतीच्या धर्तीवर आहेत. बंद्यांना ते ज्या उद्योगामध्ये काम करतात त्या उद्योगाचे प्रात्यक्षिक व सिद्धांतातील ज्ञान मिळते ते त्यांना कारागृहातून सुटल्यावर आपली उपजीविका करण्यासाठी उपयोगी पडावे अशी अपेक्षा आहे.
कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणारे बंदी बऱ्याच दिवसांपासून ज्या प्रमाणे विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी ठराविक कालावधीनंतर महागाई लक्षात घेता पगारवाढ होत असते त्याच धर्तीवर कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या बंद्यांना पगारवाढ देण्यात यावी यावी अशी विनंती करत होते.
त्यानुसार अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा ,महाराष्ट्र राज्य -श्री अमिताभ गुप्ता यांनी दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजीपासून राज्यातील कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या सर्व बंद्यांना पुढीलप्रमाणे पगारवाढ लागू करणेबाबत आदेश दिले आहेत.
१. कुशल बंदी(Skilled Prisoner )-७४/-रुपये
२. अर्धकुशल बंदी (Semi Skilled Prisoner )-६७/- रुपये
३. अकुशल बंदी (Unskilled Prisoner )-५३/-रुपये
4.खुल्या वसाहतीतील बंद्यांना -९४/- रुपये
राज्यातील सर्व कारागृहांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये दैनंदिनपणे सरासरी ७००० बंदी काम करत असतात. यामध्ये पुरुष बंदी – ६३०० व महिला बंदी -३०० च्या आसपास काम करतात. या पगारवाढीचा लाभ अंदाजे ७००० बंद्यांना होईल.
बंदी कारागृहातील उद्योगांमध्ये काम करून आर्थिक मोबदला कमवतात व त्यातून स्वतः साठी दैनंदिन गरजेच्या वस्तू कारागृह उपहारगृहातून खरेदी करतात तसेच स्वतःच्या कुटुंबियांना त्यांचे अडीअडचणी च्या वेळी पोस्टाचे माध्यमातून मनिऑर्डर करतात ,काही बंदी सदर मिळालेल्या आर्थिक मोबदल्यातून वकिलांची फी भरतात अश्या अनेक कामांसाठी बंद्यांना स्वतः खर्च करता येतो त्यामुळे बंद्यांच्यामध्ये स्वावलंबी असल्याची भावना निर्माण होते.