केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीमुळे ६० लाख क्विंटल कांदा बाजारात आल्याने शेतकऱ्यांचे बाराशे कोटी रुपयांची नुकसान झाले असून, यास भाजप सरकार जबाबदार आहे.
केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठवावी, तसेच दुधाला योग्य दर द्यावेत, दिवसा वीज पुरवठा करावा अशा विविध मागण्यासाठी काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी जुन्नर शिवनेरी येथून आक्रोश मोर्चा मंचर (ता. आंबेगाव) येथे आला असता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मोर्चाने काही साध्य होणार नाही, असे वक्तव्य करून भाजपचा शेतकरी विरोधी चेहरा सर्वांसमोर आणला असून हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने कांद्याला बाजारभावच मिळत नसल्याने ही बंदी उठवावी. निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, तालुक्यात बिबट्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा द्यावी.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई मिळावी, खतांचे वाढलेले दर कमी करावेत या मागण्या मांडल्या.
दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पाळीव जनावरे व नागरिकांचे मृत्यू झाले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा ही मागणीही करण्यात आली आहे.