डीपीसीच्या निधीमध्ये दादांची “दादागिरी”; भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून चंद्रकांतदादा यांच्याकडे गाऱ्हाणे

Photo of author

By Sandhya

अजित पवार

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार गटाची सरशी झाली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना डावलून सुमारे ८०० कोटींचा निधी वितरीत केला आहे. या मुद्यावरून भाजपने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात भूमिका घेतली आहे.

जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी तसेच जिल्हा नियोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे गाऱ्हाणे थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडले. पवार यांनी मंजूर केलेली कामे रद्द करावीत, समन्यायी पध्दतीने निधीचे वाटप व्हावे, अशी मागणी केली आहे.

अन्यथा न्यायालयात जाण्याची भूमिका मांडली आहे. यावर मंत्री पाटील यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला देत वरिष्ठांच्या कानावर ही बाब घालणार असल्याचे सांगितले.

जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी ६० ते ७० टक्के निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थकांना मिळवून दिला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांची पाच ते दहा टक्के निधीवरच बोळवण झाली आहे, परिणामी महायुतीमधील घटक पक्षांमधील नाराजी चव्हाट्यावर आली आहे.

या प्रश्नी ग्रामीण भागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत पवार यांनी मान्यता दिलेली कामे रद्द करण्याची मागणी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने बुधवारी शासकीय विश्रामगृह येथे ग्रामीण भागातील भाजपचे पदाधिकारी तसेच नियोजन समितीच्या सदस्यांची बैठक घेतली.

या बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निधीवाटपाबाबतची वस्तुथिती मांडली. तसेच जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवत निधी वाटपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आमच्यावर अन्याय होत असून आम्हाला कमी निधी मिळत आहे, एवढ्या कमी निधीत कामे करणे शक्य नाही, असे सांगितले. जर ही कामे रद्द झाली नाही तर थेट न्यायालययात धाव घेणार असल्याचे सांगितले.

मंत्री पाटील यांनी बोलणे टाळले मे महिन्यात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर केलेला आराखडा आणि त्यातील कामे बदलून परस्पर नवे पालकमंत्री अजित पवार यांनी निधीवाटप केले असल्याचे भाजपच्या पदाधिका ऱ्यांनी सांगितले. दरम्यान मंत्री पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधण्याचे टाळत या प्रश्नी बोलण्याचे टाळले.

Leave a Comment