खासदार सदाशिव लोखंडे : घाटमाथ्यावरचे पाणी शेतीसाठी वळविणार…

Photo of author

By Sandhya

खासदार सदाशिव लोखंडे

समुद्रात वाहून जाणारे घाटमाथ्याचे 115 टीएमसी पाणी अडवून ते शेतकर्‍यांना देण्यासाठी माझा लढा सुरू आहे. यासाठी बारा खासदारांनी मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे.

लवकरच या प्रयत्नांना यश येणार असल्याची माहिती शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. तालुक्यातील रस्तापूर येथील सभामंडपाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार लोखंडे बोलत होते.

प्रशांत लोखंडे,जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, जिल्हा उपप्रमुख भगवान गंगावणे, महिला आघाडी तालुकाप्रमुख मिराताई गुंजाळ, खासदार सदाशिव लोखंडे यांचे स्वीयसहायक शिवाजी दिसागत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण सावंत, सरपंच हिराबाई कोकाटे, नानासाहेब अंबाडे उपस्थित होते.

खासदार लोखंडेे म्हणाले की, 2005 मध्ये झालेल्या तत्कालीन समन्यायी पाणी वाटपाच्या काळ्या कायद्यामुळे 109 टीएमसी पाण्याची जायकवाडी धरणाची क्षमता असल्यामुळे वरच्या भागातील 65 टक्के पाणी मराठवाड्याला सोडावे लागत आहे.

नगर आणि नाशिक जिल्ह्यांचे हक्काचे 80 टीएमसी पाणी तिकडे जात असल्यामुळे कमी पाऊस झाला, तर दोन्ही जिल्ह्यावर अन्याय होत आहे. हा अन्याय दुर करण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे 115 टीएमसी घाटमाथ्यावरून वळविण्यासाठी मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करीत आहोत.

बारा खासदाराच्या शिष्ठमंडळाने भेट घेतली. यावेळी मुख्यमंञी शिंदे यांनी साकारात्मक प्रतिसाद दिला. भविष्यात समुद्राचे पाणी वळवून त्याचा उपयोग शेतीसाठी होणार असून, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील बळीराजाला मोठी ताकद देण्याची आमची भूमिका राहणार असल्याची स्पष्ट भूमिका यावेळी खासदार लोखंडे यांनी मांडली.

यावेळी बापूसाहेब दारकुंडे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश सावंत, आबासाहेब भाकड, संतोष सावंत, आसाराम मचे, संजय भाकरे, सुखदेव भाकड यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

तालुक्यातील अंमळनेर, शिरेगाव, कांगोणी, बर्‍हाणपूर, रस्तापूर, कुकाणा, जेऊर हैबती, नेवासा बुद्रुक येथे विविध विकासकामांचे लोकार्पण यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार लोखंडे यांची फटाक्यांची आतषबाजी व ढोल- ताशांच्या निनादात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

Leave a Comment