ही लोकशाही आहे, दडपशाही दिल्लीवाले करतात. विरोधात बोलला की संसदेतून बाहेर काढतात. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती दाखवतात. ही भ्रष्ट जुमला पार्टीची पद्धत आहे.
आमच्यासाठी ही लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आम्ही सत्तेत असताना कोणावर असले उद्योग व सुडाचे राजकारण केले नाही आणि कधी करणार देखील नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार खा. सुळे बोलत होत्या. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
बारामतीमधून लोकसभेला शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे, असे विचारताच मी जयंत पाटील यांच्याकडे तिकीट मिळावं यासाठी मागणी केली आहे. तुम्ही शरद पवारांना उभं करून माझं तिकीट कापताय काय? मी मेरिटवर तिकीट मागितले आहे.
आमच्या नात्यात कधीही राजकारण येणार नाही. पवार कुटुंबीय वैयक्तिक नातीगोती जपते, तसेच माझ्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत. ’मेरी इमानदारी ही मेरी ताकत है’ अशा अंदाजात खासदार सुळे यांनी आपल्यावर कोणतेही आरोप नाहीत किंवा कसलीही चौकशी नसल्याचे सांगितले.