खासदार सुप्रिया सुळे : केंद्र, राज्य सरकारशी संघर्ष अटळ…

Photo of author

By Sandhya

खासदार सुप्रिया सुळे

देशात ईडी व सीबीआय कोणाला माहिती नव्हती. आता ती घराघरांत पोहचली आहे. विरोधात बोलले की इडीची नोटीस येते. लपविण्यासाठी माझ्याकडे काहीही नसून भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर होऊ शकत नाही.

पुढील काळात केंद्र आणि राज्य सरकारशी संघर्ष अटळ असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी कोंढावळे (ता. मुळशी) येथे केले. चिंचवड-कोंढावळे-खेचरे या रस्त्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 3 कोटी 70 लक्ष रुपयांचे काम मंजूर झाले.

या कामाचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, दूध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे,

माजी सभापती कोमल वाशिवले, दिपाली कोकरे, राजेंद्र बांदल, लहूशेठ चव्हाण, दगडूकाका करंजावणे, विनोद कंधारे, विजय येनपुरे, जितेंद्र इंगवले, आनंता कंधारे, शांताराम शिर्के, सरपंच पल्लवी कंधारे, उपसरपंच नीलेश धनावडे, पोलिस पाटील राणी कंधारे, तसेच पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी खा. सुळे म्हणाल्या, रोहित पवार यांना इडीची नोटीस आली आहे. अशा कामासाठी मी राजकारणात आले नाही. चुकीच्या धोरणाविरोधात न्यायालयात लढणारच. आपण काही केलेले नसून रडत बसणार नाही. माझ्या वडिलांनी पक्ष स्थापन केलेला आहे. आताची लढाई दिल्लीकरांशी असून घरातील लोकांशी लढणार नाही.

घरात भांडणे लावून दिल्लीश्वर मजा बघत आहेत, असे मत खा. सुळे यांनी व्यक्त केले. तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे म्हणाले, सन 2014 मध्ये बारामती लोकसभेला जे पराभूत झाले ते पुढे कॅबिनेट मंत्री झाले. मात्र त्यांनी मुळशी तालुक्याला निधी दिला नाही. चिंचवड गावात जाणार्‍या रस्त्याला शासकीय निधी आधी मिळाला नव्हता.

चिंचवड-खेचरे ग्रामस्थांनी सतत पाठपुरावा केला. कोविडच्या काळात खासदारांना निधी मिळाला नाही. आंदेशे-मांदेडे रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Leave a Comment