लाडकी बहीण योजना: छाननीचे निकष कठोर, योजनांच्या बंद होण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण

Photo of author

By Sandhya


लाडकी बहीण योजना: निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सादर केली. या योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचे हप्ते देण्यात आले. मात्र, आता महायुतीचं सरकार आल्यानंतर या योजनेचे निकष कठोर केले जाणार असल्याची चर्चा आहे. या योजनेसाठी पात्र नसलेल्या महिलांना यापुढे योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी केली जाईल. त्यानुसार निकषबाह्य अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार छगन भुजबल यांनी अपात्र लाडक्या बहिणींना इशारा दिला आहे. नियमांत न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून आपली नावं योजनेतून काढून टाकायला हवीत, असंही ते म्हणाले.

छगन भुजबळ म्हणाले, “अपात्र महिलांनी योजनेतून आपलं नाव काढून घेण्यासाठी त्यांना आवाहन केलं पाहिजे. तसेच, सरकारने आतापर्यंत ज्या अपात्र महिलांना या योजनेचे पैसे दिले आहेत ते परत मागण्यात काही अर्थ नाही. सरकारनेही ते पैसे आता मागू नये. मात्र, लोकांना यापुढे सांगावं की नियमांत न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून या योजनेतून त्यांचं नाव काढून घ्यावं, अन्यथा त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल. याआधी आपण जे पैसे महिलांना दिले आहेत ते आपण लाडक्या बहिणींना अर्पण केलेत असं समजूया, ते परत मागू नयेत.”

उदय सामंत काय म्हणाले?
दरम्यान, महायुतीचं आता सरकार आलं आहे, त्यामुळे आता राज्य सरकार टप्प्याटप्प्याने योजना बंद करू शकतं. अशी चर्चा चालू आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सामंत म्हणाले, “लाडक्या बहिणींमुळे आम्ही पुन्हा सत्तेत आलेलो आहोत. ज्यांच्यामुळे आम्हा सर्वांना पुन्हा एकदा सत्तेपर्यंत जाता आलं अशा लाडक्या बहिणी, राज्यातील ज्येष्ठ नागरिक व तरुणांमुळे आम्ही पुन्हा सत्तेत बसलो, त्यांच्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत. त्या योजना कुठेही खंडित होणार नाहीत, बंद केल्या जाणार नाहीत”.

दरम्यान, सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही, असं मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page