Lakhs of liters of water wasted in Tukaram Tupe Nagar, Hadapsar!

Photo of author

By Sandhya

हडपसरच्या तुकाराम तुपे नगर मध्ये लाखो लिटर पाणी वाया!

शिवसेनेचा महापालिकेवर दुटप्पीपणाचा आरोप

पुणे : पुणेकरांना एका दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करून पाणी बचतीचे धडे देणाऱ्या पुणे महानगरपालिकेचाच दुटप्पी कारभार हडपसरच्या तुकाराम तुपेनगर परिसरात उघड झाला आहे. येथे गेल्या काही दिवसांपासून लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात असतानाही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केला आहे.

भानगिरे यांनी म्हटले आहे की, “पुणेकरांनी प्रत्येक थेंब जपायचा आणि महानगरपालिकेने लाखो लिटर पाणी वाऱ्यावर उधळायचे, हा कसला कारभार?” पाणीटंचाईचे खापर नागरिकांच्या माथी फोडणाऱ्या अधिकाऱ्यांनी आधी स्वतःचा गळका आणि निष्क्रिय कारभार पाहावा, अशी टीका त्यांनी केली.

तुकाराम तुपेनगर येथे गळतीमुळे पाणी रस्त्यावर वाहून जात असून, हे महापालिकेच्या बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा आणि अपयशी व्यवस्थेचे जिवंत प्रतीक असल्याचे भानगिरे यांनी म्हटले आहे.

तातडीने कारवाईची मागणी

लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया घालवणाऱ्या बेजबाबदार अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पुणे शहरात सध्या पाणीटंचाईमुळे एका दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक पाणीगळतीकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबत तातडीने दुरुस्ती करून जबाबदारांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही भानगिरे यांनी दिला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page