नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. दरम्यान, आता शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात पुरावे नसतानाही त्यांना जेलमध्ये डांबून ठेवले. या देशामध्ये या देशांमध्ये लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ सुरु आहे’, असे संजय राऊत यांनी सांगितले.
शुक्रवारी मुंबईत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ईडी, सीबीआयच्या मदतीने लोकशाहीचा खेळ सुरु आहे. आता तरी ईडी, सीबीआयने सुधारावं. ईडी, सीबीआयच्या गैरवापरामुळे जनतेने मोदी यांना नाकारले आहे. अमित शाहांच्या सांगण्यावरून ईडीचा दहशतवाद सुरु आहे, असे संजय राऊत म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी जामीन मंजूर झाला. त्यावर संजय राऊत म्हणाले, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अजूनही आहेत. त्यांना मुख्यमंत्री असताना अटक केली. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही, कारण जनतेचाच कौल त्यांना असल्याने त्यांनी राजीनामा दिला नव्हता.
मुख्यमंत्री म्हणूनच त्यांना तुरुंगात टाकले. अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे आणखी दोन-तीन मंत्री आहेत. ज्यांना ईडी, सीबीआयने आत टाकले. या सर्वांना अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेने चपराक मिळाली आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
पुढे संजय राऊत म्हणाले, अरविंद केजरीवाल यांचा दोष इतकाच की देशाच्या राजधानी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा वारंवार पराभव केला. त्यामुळेच काही खोट्या प्रकरणाची उभारणी करून त्यांना अटक केली. जसं मला अटक केली, अनिल देशमुख यांना अटक केली. या देशात काही वर्षांपासून लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
याचबरोबर, संपूर्ण घटनात्मक संस्था सरकारच्या बाहुल्यांप्रमाणे काम करत आहेत. अरविंद केजरीवाल, संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक, हेमंत सोरेन, मनीष सिसोदिया यांना पुराव्याशिवाय अटक केली जाते. पण आम्ही पुरावे देऊनही कारवाया होत नाहीत, याबाबत आम्ही जाब विचारणार आहोत, असेही संयज राऊत म्हणाले.