महसुलमंत्री विखे-पाटील : पानेवाडीतून पोलीस बंदोबस्तात टॅंकर बाहेर काढा…

Photo of author

By Sandhya

महसुलमंत्री विखे-पाटील

वाहतूकदारांच्या संपामुळे पेट्रोलपंपावर वाहनांच्या रांगा लागल्या असून स्थिती गंभीर आहे. पानेवाडी (मनमाड) प्रकल्पामधुन पोलीस बंदोबस्तात इंधन टँकर बाहेर काढा, असे आदेश महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी (दि.२) जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

संध्याकाळ पर्यंत परिस्थिती निवळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या नवीन हिट अॅण्ड रन कायद्याविरोधात देशभरातील वाहतूकदारांनी संप पुकारला आहे.

संपाचा आज दुसरा दिवस आहे. यादरम्यान, नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री विखे-पाटील यांचे संपाकडे लक्ष वेधण्यात आले. ते म्हणाले हिट अॅन्ड रन कायद्याविषयी थोडा समज गैरसमज आहे.

अनेक ठिकाणी संप मागे घेतले आहेत. स्थिती तशीच राहिल्यास गंभीर आहे. पेट्रोल पंपावर रांगा लागल्या असून येणाऱ्या बातम्यांमुले लोक तणावात असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.

संपाच्या पार्श्वभुमीवर मनमाडच्या पानेवाडीतून बंदोबस्तात इंधन टँकर बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहे. कायदा कुणीही हातात घेणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही विखे-पाटील यांनी केल्या आहेत.

संपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत केंद्र सरकाला माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री विखे-पाटील यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा हे तातडीने पानेवाडीकडे रवाना झाले.

मोदींच्या उपस्थितीत निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व स्विकारले आहे. राज्यात महायुतीचा फॉर्म्युला पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीचा फॉर्म्युला ठरणार असल्याचे विखे-पाटील म्हणाले.

कॉग्रेसला नेतृत्व कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित करताना वाटाघाटी करायला फक्त नेते येतात. त्यात वाटा कोणाला आणि घाटा कोणाला याचीच चर्चा आहे, असा टोला त्यांनी लगावला.

कॉग्रेसमधील अनेकांची इकडे येण्याची इच्छा असल्याचा दावा विखे-पाटील यांनी केला. इंडिया आघाडीत बिघाडी असून राज्य व देशात गेलेली सत्ता कशी मिळवायची एवढीच त्यांना चिंता असल्याचा टोमणा विखे पाटील यांनी लगावला.

चर्चेतून मार्ग निघतो मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाबाबत विचारले असता विखे-पाटील म्हणाले, आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहे.

अनेक राज्यांमध्ये यापूर्वी आंदोलने झाली आहेत. जरांगे यांनी चर्चेला यायला हवं, अशी अपेक्षा व्यक्त करताना चर्चेतून मार्ग निघतो, अशी प्रतिक्रिया विखे-पाटील यांनी व्यक्त केली.

Leave a Comment