Mahatma Phule’s bicentennial year begins with a historic ceremony at Khanwadi.

Photo of author

By Sandhya

महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी वर्षाचा खानवडीतून ऐतिहासिक शुभारंभ..

‘ज्योती-सावित्री’ सामाजिक परीवर्तनाचे केंद्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

​अजितदादांच्या दूरदृष्टीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; मान्यवरांच्या मांदियाळीत फुले दांपत्याला ‘भारतरत्न’ देण्याची मागणी

“क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाची सुरुवात त्यांच्या मूळ गावातून करणे ही त्यांना खरी मानवंदना आहे. दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पुढाकाराने खानवडी येथे उभारलेली ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा’ ही केवळ एक वास्तू नसून फुले दांपत्याच्या विचारांचे जिवंत स्मारक आहे,” असे गौरवपूर्ण प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

​महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त खानवडी येथे शनिवारी (दि. ११) पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित ज्योती सावित्री शाळेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांनी या शाळेसाठी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला.

​मुख्यमंत्री म्हणाले की, महात्मा फुले हे उत्कृष्ट शेतकरी आणि बांधकाम व्यावसायिकही होते. मुंबई महापालिका, येरवडा जेल आणि कात्रज बोगदा यांसारखी बांधकामे त्यांच्या दूरदृष्टीचे पुरावे आहेत. आज या शाळेत मुलींचा आत्मविश्वास पाहून सावित्रीबाईंच्या कार्याची प्रचिती येते. पुणे जिल्हा परिषदेने ‘इंडस्ट्री ४.०’ अंतर्गत १०० शाळांत प्रगत प्रयोगशाळा दिल्या असून, हा उपक्रम आता राज्यभर राबविला जाईल. तसेच तरुणांसाठी १,००० नवीन कौशल्य विकास केंद्र उभारली जातील. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना आरक्षण दिले असले तरी, राजकीय क्षेत्रात महिलांबाबत मानसिकता बदलण्यासाठी महात्मा फुलेंचे विचार आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

​उप उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाषणात अजितदादा पवार यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. ग्रामस्थांच्या मागणीवरून अजितदादांच्या दूरदृष्टीतून खानवडी येथे ‘ज्योती सावित्री सीबीएसई शाळा’ साकारली आहे. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून दादांनी सीएसआर फंड आणि शासकीय निधीच्या माध्यमातून ही भव्य वास्तू उभी केली. ही जिल्हा परिषदेची पहिली सीबीएसई शाळा असून, सध्या २६० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. भविष्यात १८४० विद्यार्थ्यांची क्षमता आणि निवासी सुविधांसह हे केंद्र परिवर्तनाचे मुख्य स्त्रोत ठरेल. आज ही वास्तू स्त्री सक्षमीकरणाची खऱ्या अर्थाने प्रेरणा देत आहे.

पुढे बोलताना सुनेत्रा पवार यांनी, फुले दांपत्याच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या विविध स्मारकांसह नायगाव येथे उभारण्यात येणारे १०० कोटींचे स्मारक ही पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील. या स्मारकांमध्ये महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच, खानवडी येथील शाळेत आधुनिक शैक्षणिक सुविधा, क्रीडांगण आणि महात्मा फुलेंच्या जीवन विचारांवर संशोधन केंद्र उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी केली.

​मंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, जनतेने त्यांना ‘महात्मा’ पदवी त्यांच्या कामामुळेच दिली. खानवडी हे गाव आता परिवर्तनाचे केंद्र बनत आहे. नरेंद्र मोदींनी महात्मा फुलेंची देशभर साजरी केलेली जयंती आणि महिलांना लोकसभा आणि विधानसभेतील दिलेले ३० टक्के आरक्षण ही फुले दांपत्याला वाहिलेली खरी श्रद्धांजली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.​

याप्रसंगी उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी, फुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळावा ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा असून, राज्य सरकारने तसा ठराव केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यात १,००० नवीन कौशल्य विकास केंद्र उभारण्याची घोषणा केली. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर राज्यातील इतर जिल्हा परिषदांमध्येही ‘मॉडेल स्कूल’ आणि प्रगत प्रयोगशाळा उभारणार असल्याचे स्पष्ट केले.

महात्मा फुलेंनी १८४८ मध्ये मानवी हक्कांची सनद मांडली आणि हंटर कमिशनसमोर सक्तीच्या शिक्षणाची मागणी केली, जो आजच्या ‘आरटीई’ कायद्याचा पाया ठरला. शिवजयंती उत्सवाचा पाया रचणाऱ्या या महामानवाला त्यांच्या अफाट कार्यामुळेच जनतेने ‘महात्मा’ ही पदवी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महात्मा फुले ‘जन आरोग्य’ योजनेतून रुग्णांना उपचार आणि ‘महाज्योती’तून विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी बनन्याची आणि करिअरची संधी मिळत आहे. सरकार भिडे वाडा, फुले वाडा व नायगाव येथील स्मारकांचे काम वेगाने पूर्ण करत असून, द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांतून त्यांचा विचार घराघरांत पोहोचवला जाईल., असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

​याप्रसंगी मंत्री जयकुमार गोरे, चंद्रकांत पाटील, अतूल सावे, मंगलप्रभात लोढा, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, दादाजी भुसे, योगेश कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार बापूसाहेब पठारे, राहुल कुल, शंकर मांडेकर, योगेश टिळेकर, माजी आमदार संजय जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, चंद्रशेखर वढणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, प्रधान सचिव एकनाथ डवले, रणजित सिंह देओल, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर, संजय नाईकवाडे, सभापती अंकिता पाटील, दिपाली हुलावळे, जितेंद्र बढेकर, अमोल नलावडे, सदस्य हरीभाऊ लोळे, अजय इंगळे, प्राजक्ता दुर्गाडे, रूपाली झेंडे, पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे, सदस्य माऊली यादव, सायली शिंदे सर्व सदस्य, सरपंच, सर्व सदस्य उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आभार मानले. खानवडीतील या भव्य सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी होती.

Leave a Comment

You cannot copy content of this page