महत्वाची बातमी : गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे टास्क फोर्सचे निर्देश…

Photo of author

By Sandhya

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे टास्क फोर्सचे निर्देश

कोरोनाला साथ रोखण्यासाठी राज्य शासनाने टास्क फोर्स स्थापन केले असून, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी चव्हाण यांनी गुरुवारी टास्क फोर्ससमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महापालिका आयुक्तांसह वैद्यकीय विभागाला मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोरोनाच्या नियंत्रणासाठी अद्याप कुठलेही निर्बंध लागू केले नसले तरी संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याच्या सूचना करताना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यासह वृद्ध व आजारी व्यक्तींना घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने पुन्हा एकदा देशभरात धडकी भरवली आहे. केरळपाठोपाठ महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे राज्य शासनाने कोरोना नियंत्रणासाठी डॉ. रमन गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन केले आहे.

जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथील एक महिला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तर सिन्नरमध्येही दोन रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला असून, जिल्हा शल्यचिकित्सक आणि पालिकेच्या वैद्यकीय विभागाने संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी सज्जता ठेवली आहे.

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ गुरुवारी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी डॉ. गंगाखेडकर यांच्यासोबत व्हीसीद्वारे नाशिक महापालिकेच्या तयारीचा आढावा घेतला आहे. आयुक्त डॉ. अशोक करंजकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी यात सहभाग घेतला. यावेळी टास्क फोर्सने महापालिका आयुक्तांना खबरदारीच्या सूचना केल्या.

कोरोना चाचण्या वाढवाव्यात, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यासंदर्भात जनजागृती करावी, तसेच वृद्ध व आजारी व्यक्तींना घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरात संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सहा दिवसात ५१ संशयितांच्या ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. या सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहरात अद्यापही कोरोना रुग्ण आढळलेला नाही.

Leave a Comment