लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता देशातील काही ठिकाणी दोन टप्प्याचे मतदान होणार आहे. यानंतर ०४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला आहे.
तसेच जातीच्या नावाखाली आमच्यावर अन्याय करू नका. अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
एका सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्यांचेच लोक त्यांना पाडणार आणि मराठ्यांचे नाव घेणार. मतदानापर्यंत मी आणि माझा समाज चांगला होता, मात्र, त्यानंतर आम्ही वाईट अशी तुमची नियत झाली. सगळ्यांनी शांत राहा, फक्त एक महिनाभर शांत राहा. काहीजण म्हणतात की, निवडणूक झाल्यावर बघू, मतदान झाल्यावर बघू. आता कोण काय करतो ते आम्ही पाहून घेऊ, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
कोण पडला, कोण निवडून आला याचे उत्तरही देऊ नका फक्त शांत राहून कोण काय करतो पाहा. कोणी काय पोस्ट टाकतो, त्याचे नाव लिहून ठेवा. कोण पडला, कोण निवडून आला याचे उत्तरही देऊ नका.
तुमच्यावर जर काही वेळ आली, तुमचा काही घातपात होण्याचा अंदाज दिसला तर मी म्हणतो म्हणून शांत बसू नका. वेळ आली तर आपला उमेदवार द्यायचा नाही, पण त्याला पाडल्याशिवाय शांत राहायचे नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडून धक्का लागता कामा नये. पुन्हा असे म्हणू नका की, आम्ही तिकडे का निघालो. मी एक महिना शांत बसणार, पण या महिन्यात काही झाले तर आम्हालाही गुंडगिरीचे चांगले अड्डे माहीत आहेत, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
दरम्यान, या लोकसभेच्या निवडणुकीच्या गुलालमध्ये आम्हाला आनंद नाही. आमच्या लेकराचे कल्याण करण्यासाठी आरक्षणाचा गुलाल आम्हाला हवा आहे. एकजूट फुटू देऊ नका. जात मोठी करायची आणि जातीचे लेकर मोठे करायचे आहे. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हाटत नाही फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील बांधवांना केले.