महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीवर आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील ठाम असून, अनेक ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यातच मनोज जरांगे पाटील यांना अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अशात मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनेक ठिकाणी सभा आयोजित केल्या जातात. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात.
अशातच रोहित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी खळबळजनक दावा केला आहे. मराठा आरक्षणसाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील राजकारण प्रवेश करतील असा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय.
मनोज जरांगे पाटील जानेवारीमध्ये राजकारणात येतील असंही रोहित पवार म्हणाले आहे. दरम्यान, रोहित पवार यांच्या या विधानानंतर जरांगे पाटलांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. जरांगे पाटील एखाद्या राजकीय पक्षात जातील की स्वतःचा वेगळा पक्ष काढतील हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.