मनोज जरांगे पाटील : “माझ्या नादी लागू नका, तुमचा कार्यक्रमच लावणार, सोडणार नाही”

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे पाटील

बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आहे. सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा जवळपास ७ हजार मतांनी पराभव केला.

विविध कारणामुळे निवडणूक काळात राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. बीडमध्ये अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी वाजली आहे. या विजयानंतर बजरंग सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत जनतेचे आभार मानले आहेत.

निवडणुकीच्या निकालावर मनोज जरांगे पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या नादी लागू नका, तुम्ही गोडीगुलाबीने तुमचं काम करा. जर तुम्ही हे नाही दिलं तर मात्र मी २८८ उमेदवार महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे उभे करणार.

तुमचा कार्यक्रमच लावणार, सोडणार नाही” असं म्हणत इशारा दिला आहे. “मराठ्यांची भीती निर्माण झाली हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आरक्षण देऊन त्यांना किंमत आणणार आहे. पुढचा विषय कोण निवडून आलं आणि कोण पडलं? तर त्यात कुठे आम्हाला आनंद आहे… नाहीच आहे.”

“आमच्या आरक्षणाच्या गुलालात आम्हाला आनंद” “राजकारण हा माझा मार्ग नाही आणि माझ्या समाजाचाही नाही. त्या गुलालात आम्हाला आनंद नाही, आमच्या आरक्षणाच्या गुलालात आम्हाला आनंद आहे. मी राजकारणात नाही. कोणालाही पाडा असं म्हटलेलं नाही.

आम्ही काय सांगितलं, कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा पण यावेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे. समाजाने ठरवलं आणि त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी होती.” “माझ्या नादी लागू नका” “माझ्या नादी लागू नका, तुम्ही गोडीगुलाबीने तुमचं काम करा.

जर तुम्ही हे नाही दिलं मग मात्र मी २८८ उमेदवार महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे उभे करणार. तुमचा कार्यक्रमच लावणार, सोडणार नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन बनवणार, गोरगरिबांसाठी बनवणार. ८ जूनला आमरण उपोषणाला बसत आहे. तुम्ही तातडीने, तत्काळ निर्णय घ्या.

मी जाहीरपणाने पुन्हा एकदा सांगतो मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस साहेबांना की, तुम्ही आमचा हक्क आम्हाला देऊन टाका” असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.

निवडणूक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देत असताना पत्रकारांनी बजरंग सोनवणे यांना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयीही प्रश्न विचारला.

जरांगे पाटील फॅक्टर तुमच्या मतदारसंघात कामी आला का? या प्रश्नावर बोलताना सोनवणे म्हणाले की, “१०० टक्के हा फॅक्टर कामी आला. मराठा आरक्षण चळवळीचा मला फायदा होईल आणि या आरक्षणाचा प्रश्न मी संसदेत मांडणार, असंच मी सुरुवातीपासून बोलत आहे.”

Leave a Comment