मंत्री उदय सामंत : “संविधान बदलाच्या चर्चेचा निवडणूक प्रचारात महायुतीला फटका”

Photo of author

By Sandhya

मंत्री उदय सामंत

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ‘अब की बार ४०० पार’ असा नारा दिला आहे. भाजपाप्रणित एनडीएने निवडणुकीत ४०० जागा जिंकण्याचं ध्येय डोळ्यांसमोर ठेवलं आहे. भारतात सत्तास्थापन करण्यासाठी केवळ २७३ जागांची आवश्यकता असते.

मागील दोन्ही निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं होतं. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने २८२, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३०२ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी भाजपाने थेट ४०० जागा जिंकण्याचा संकल्प केल्यामुळे विरोधकांकडून भाजपाच्या हेतूंवर संशय व्यक्त केला जात आहे.

भाजपा देशाचं संविधान बदलण्यासाठी आणि आरक्षण संपवण्यासाठी ४०० जागा जिंकण्याच्या गोष्टी करतेय, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.

भाजपा यंदा ४०० जागा जिंकली तर यंदाची लोकसभा निवडणूक ही अखेरची असेल, असा दावा विरोधक करत आहेत. तसेच आम्ही ही निवडणूक केवळ देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी लढतोय, असा प्रचारही विरोधक करत आहेत.

विरोधकांच्या या प्रचाराचा सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना फटका बसत असल्याचं वक्तव्य राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत सामंत यांनी मान्य केलं आहे की, विरोधकांनी संविधानावरून सुरू केलेल्या प्रचाराचा महाराष्ट्रात महायुतीला फटका बसतोय.

उदय सामंत म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट नाही, परंतु नरेंद्र मोदी यांचे वलय अद्याप संपलेलं नाही. देशातील तरुण आणि महिला रांगा लावून मोदींना आणि एनडीएला मतदान करत आहेत. निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा चालतो आहे.

विरोधक दावा करतायत की, मुस्लिम समाज भाजपावर, आमच्यावर नाराज आहे, मात्र तीन तलाक बंदीमुळे मुस्लिम महिला भारतीय जनता पार्टीला मतदान करत आहेत. आरक्षण आणि कुणबी दाखले दिल्यामुळे राज्यातला मराठा समाज खूष आहे. हे करत असताना इतर मागासवर्गाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावलेला नाही, त्यामुळे ओबीसी समाज आमच्यापासून दुरावला यात काहीच तथ्य नाही.

यासह जातीपातीच्या आधारे मतदारांचे ध्रुवीकरण करण्यात विरोधकांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. ४०० पारचा जो भाजपाचा नारा होता, त्याचा संदर्भ देऊन राज्यघटना बदलवण्याची भीती काँग्रेसकडून मतदारांना दाखवली जात आहे. काँग्रेसच्या या अपप्रचाराचा फटका महायुतीला काही प्रमाणात बसतो आहे. याला काँग्रेस जबाबदार आहे. खोटं बोल पण रेटून बोल ही काँग्रेसची आजपर्यंतची परंपराच आहे.

दरम्यान, उदय सामंत यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती किती जागा जिंकेल याबाबतही अंदाज व्यक्त केला. सामंत म्हणाले, लोकसभेत राज्यात महायुती नक्कीच ४० पेक्षा अधिक जागा जिंकेल. ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं आमचं उद्दिष्ट आहे.

पहिल्या दोन टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानात महायुतीला अनुकूल असंच मतदान झालं आहे. विरोधकांकडे कोणताही कार्यक्रम नाही. यामुळेच जातीय आधारावर टीकाटिप्पणी विरोधकांकडून केली जात आहे. त्याचा त्यांना काहीच फायदा होणार नाही.

Leave a Comment