भाजप विरोधात असलेल्या इंडिया आघाडीची सध्या देशभर चांगलीच चर्चा आहे. असं असलं तरी भविष्यातील निवडणुकांमध्ये ही आघाडी नेमकी कशी लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अशात मुंबईत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये तीन महत्वाचे ठराव झाल्याचे समोर आले आहे. भाजप विरोधात विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.
या पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या इंडिया आघाडीने देशभरातील आगामी निवडणूक लक्षात घेता काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मुंबईत पार पडलेल्या या आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेससह देशभरातील इतर स्थानिक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
हे तीन ठराव घेण्यात आले यावेळी इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुका शक्य तितक्या एकत्र लढवण्याचा संकल्प केला.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागा वाटपाची व्यवस्था ताबडतोब सुरू केली जाईल आणि लवकरात लवकर जागा वाटपाची ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी देशातील वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रितपणे सार्वजनिक रॅली आयोजित करण्याचा संकल्प केला.
इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी विविध भाषांमध्ये ‘जितेगा भारत’ या थीमसह सर्व धोरणे आणि मोहिमांमध्ये समन्वय साधण्याचा संकल्प देखील केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या महाराष्ट्रातील नेत्यांची इंडिया आघाडीच्या समन्वय समितीमध्ये निवड करण्यात आली. मुंबईत पार पडलेल्या इंडियाच्या बैठकीत ही समिती बनवण्यात आली आहे.