महायुतीच्या सरकारने दोन वर्षांत समाजातील सर्व घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी झपाट्याने निर्णय घेतले, त्यामुळे हे सर्वसामान्यांचे सरकार असून, आम्ही फक्त फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधत नाही, तर त्यांच्यात जाऊन काम करतो, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
गेल्या दोन वर्षांत महायुतीने सिंचनाच्या १२२ योजनांना मंजुरी दिली. महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेची व्याप्ती पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांत महाराष्ट्र राज्यात तब्बल आठ लाख कोटींची कामे सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या विचारांचे सरकार असेल तर प्रश्न लवकर सुटतात, म्हणून हेमंत गोडसे यांना साथ देण्याचे आवाहन नाशिकमधील व्यावसायिक संघटना, धार्मिक व सामाजिक संघटनांना केले.
शहरातील बांधकाम, वास्तुविशारद, नरडेको, धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक यांसारख्या विविध ५६ संस्थांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी (ता. १२) मनोहर गार्डनमध्ये संवाद साधला. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुहास कांदे, भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, ॲड. माणिकराव कोकाटे, प्रसिद्ध उद्योजक जितू ठक्कर, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींचे प्रश्न प्रथमतः जाणून घेतले. मुख्यमंत्री म्हणाले, की लवकरच नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत राज्य सरकारची बैठक होणार आहे. या बैठकीत विविध संघटनांना सहभागी करून घेतले जाईल. बांधकाम व्यावसायिकांचा मूळ प्रश्न असलेल्या इमारत पुनर्विकासाबाबत ठाणे आणि नाशिक यांच्यातील भेदभाव नष्ट करण्यात येईल. ‘म्हाडा’ची एनओसी रद्द करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मुख्यमंत्री उद्योजकता विकास योजनेमार्फत ३५ टक्के सबसिडी दिली जाते, तसेच राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ जनतेला मिळावा म्हणून आपण ‘शासन आपल्या दारी’ या माध्यमातून देशातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले. दावोस येथील उद्योजकांच्या मेळाव्यातून आपण पहिल्या टप्प्यात एक लाख ३७ हजार कोटींचा, तर दुसऱ्या टप्प्यात तीन लाख ७३ हजार कोटींचा करारही केला.
देशातील उद्योजकांना महाराष्ट्र हा सुरक्षित वाटू लागल्यावरच त्यांनी येथे उद्योग उभारण्यास सुरवात केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग आपल्याकडे येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर ‘क्रेडाई’चे अध्यक्ष कृणाल पाटील, ‘नरेडको’चे प्रतिनिधी सुनील गवांदे, केमिस्ट असोसिएशनचे रत्नाकर वाणी, मंगल कार्यालय व लॉन्सचे अध्यक्ष सुनील चोपडा, क्वालिटी सिटीचे जितूभाई ठक्कर, शैक्षणिक क्षेत्रातून राजेंद्र निकम, द्राक्ष बागायतदार संघटना, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे राजेंद्र फड.
धान्य व्यापारी संघटनेचे प्रफुल्ल संचेती, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, क्रिकेट असोसिएशनचे समीर रकटे, केटरिंग असोसिएशनचे गाढवे, ‘सावाना’चे प्रा. फडके व रोटरी क्लबच्या प्रतिनिधींनी आपले प्रश्न मांडले. शिवसेनेचे उपनेते बोरस्ते यांनी सूत्रसंचालन केले.
माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी आभार मानले. समृद्धी महामार्ग बदल घडवेल नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग नसून, संपूर्ण महाराष्ट्राचा जीवन मार्ग ठरणार आहे. या महामार्गालगत १८ ठिकाणी विविध प्रकारचे उद्योग उभारण्याचा मानस आहे.
शेतकऱ्यांसाठीही या मार्गावरून शेतमालाची वाहतूक करता येईल. वेअर हाउसच्या उभारणीतून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.