मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : गणेशोत्सव मंडळांना एकदाच घ्यावी लागणार परवानगी

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांसाठी उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयामुळे गेल्या दहा वर्षांत सर्व नियम, कायद्यांचे पालन करणार्‍या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांना आगामी वर्षासाठी आणखी उत्कृष्ट नियोजन करता येणार आहे.

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पुढील पाच वर्षांकरिता एकदाच परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती.

यावेळी एका याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांकडेही लक्ष वेधण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, नगरविकास विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे.

या निर्णयानुसार, यावर्षीच्या 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार्‍या गणेशोत्सवात शासन नियमांचे व कायद्यांचे पालन करणार्‍या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता परवानगी देण्याची कार्यवाही सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगरपंचायती यांना करावी लागणार आहे.

महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांच्या मालकीच्या जागेवर गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जागा देताना नाममात्र असे शंभर रुपये भाडे घेता येईल.

तसेच उत्सवाकरिता यापूर्वी वेळोवेळी विहित केलेले शासन निर्णय, आदेश यानुसार अटी-शर्तींचे मंडळांना पालन करावे लागेल. मंडळांना स्थानिक पोलिस ठाणे यांच्याकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र प्राप्त करून ऑनलाईन माध्यमातून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागणार आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page