राज ठाकरे : पोटातले ओठावर आणताना भान ठेवा

Photo of author

By Sandhya

राज ठाकरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणावर तोडगा निघाला, ही समाधानाची बाब आहे. मात्र, त्यासाठी कोणतीही पूर्ण न होणारी आश्वासने दिली नसावीत, अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

तसेच सरकार या सगळ्यातन बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरू असू शकतात याचे भान ठेवून पोटातले ओठावर आणताना विचार करेल, असा टोलाही राज यांनी लगावला.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी उपोषण सोडले. त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत भाष्य केले.

आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे. त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे. या तरुणांना रोजगार, स्वयंरोजगार मिळेल. यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे सरकारने बघितले पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.

तसेच, महाराष्ट्रात मागील १७ – १८ दिवस जे घडले, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणींवर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत, अशी अपेक्षाही राज यांनी व्यक्त केली.

Leave a Comment