मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपला जन्म सर्वसामान्य मराठा शेतकर्‍याच्या घरात झाला आहे. समाजाच्या वेदना आणि व्यथांची मला जाणीव असल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आतापर्यंत अत्यंत सामंजस्य आणि शांतपणे आंदोलन केलेल्या मराठा समाजाने कायदा हातात घेऊ नये, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले, जालना जिल्ह्यातील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

या आंदोलनाचे नेते जरांगे-पाटील यांच्याशी मी संवाद साधला होता. त्यांच्या मागण्यांबाबत माझ्या अध्यक्षतेखाली बैठकाही झाल्या होत्या. त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून कार्यवाही सुरू होती.

परंतु त्यानंतरही आंदोलन सुरू झाले. जरांगे-पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची मी विनंती केली होती. त्यादरम्यान आंदोलकांची प्रकृती खालावली.

त्यांच्या जीवाची काळजी होती म्हणूनच जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक तेथे गेले. जरांगे-पाटील यांनी रुग्णालयात दाखल व्हावे, अशी विनंती त्यांना केली जात होती. मात्र, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. तसेच, या घटनेतील सर्व जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Comment