राज्यासह देशभरातील सर्व वारकरी व विठुरायाचे भक्त गेल्या काही दिवसांपासून ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होते तो सोनियाचा दिवस उजाडला आहे. सर्व वारकरी आषाढी एकादशीची वाट पाहत असतात. आज तो दिवस उजाडला असून गेल्या काही दिवसांपासून दिंड्या-पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारकरी देखील पंढरपुरात दाखल झाले आहेत.
दुसऱ्या बाजूला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा देखील संपन्न झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक (लता शिंदे) ही शासकीय महापूजा पार पाडली. भाविकांची विक्रमी गर्दी, टाळ मृदुंगाचा जयघोष, भजन, हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता यांनी मोठ्या उत्साहात विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत असं विठुरायाचरणी साकडं घातलं.