सातारा जिल्ह्यातील ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार असून या कार्यक्रमाचा शुभारंभ तसेच नूतन चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ई-भूमिपूजन,
प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 6 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आणि प्राथमिक आरोग्य केंद्राना आय आय केअर फाउंडेशन बारामती यांनी सीएसआर अंतर्गत दिलेल्या १२५ संगणकांचा वाटप कार्यक्रम बुधवारी (दि.३) दुपारी १२.३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीपतराव महाविद्यालय,
शिरवळ ( ता. खंडाळा) येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. समाजातील सर्व घटकांना आरोग्य संपन्न जीवन जगण्याचा अधिकार असून जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदा, गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देण्याचा निश्चय सातारा जिल्हा परिषदेमार्फत नेहमीच केला जातो.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केद्रांद्वारे अत्याधुनिक सुविधा व उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र हा नाविण्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने राबविण्याचा मानस ठेवला आणि त्याचीच प्रचिती म्हणून बुधवारी ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा शुभारंभ करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री शंभूराज देसाई, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान पवारवाडी (ता. फलटण) निनाम (ता. सातारा) एकंबे (ता. कोरेगाव) व मारुल हवेली (ता. पाटण) या नवीन चार प्राथमिक आरोग्य केंद्राचे ई-भुमिपूजन होणार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी ५२ कोटी रुपयांच्या कामास प्रशासकीय मंजुरी व कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.
नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र ताथवडा, गुरसाळे, क्षेत्र माहुली, अंगापूर व येळगाव या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने नव्याने सहा रुग्णवाहिकांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.
आय आय केअर फांउडेशन बारामती संस्थेमार्फत जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १२५ संगणक मोफत पुरवण्यात आले आहेत. या संगणकांचे प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्यावतीने ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले आहे.
४१ कोटी ३९ लाख निधीची आवश्यकता “आयुष्यमान भारत” कार्यक्रमांतर्गत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या उपक्रमांतर्गत ४९ प्राथमिक आरोग्य केद्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जावळी तालुक्यातील कुडाळ, कुसुंबी, बामणोली (कसबे).
कराड तालुक्यातील उंब्रज, रेठरे बुद्रुक, काले, कोळे, येवती मसूर, हेळगाव, सुपने, वडगाव हवेली. खटाव तालुक्यातील डिस्कळ, पुसेसावळी, कातरखटाव, निमसोड, मायणी. माण तालुक्यात मार्डी, मलवडी, पुळकोटी, शिंगणापूर. महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा, तळदेव. खंडाळा तालुक्यातील शिरवळ, लोणंद.
पाटण तालुक्यातील मरळी, मोरगिरी, केरळ, मरुड, सळवे, तारळे, चाफळ, काळगाव, सोनावडे. कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर, वाठार स्टेशन, पळशी, सातारारोड, तडवळे. सातारा तालुक्यातील कुमठे, कण्हेर, नागठाणे, नांदगाव, ठोसेघर. फलटण तालुक्यात बिबी, राजाळे. वाई तालुक्यातील भुईंज, बावधन व कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे.
या आरोग्य केंद्रासाठी ४१ कोटी ३९ लाख १७ हजार निधीची आवश्यकता असून, त्यापैकी जिल्हा नियोजन समितीकडून १९ कोटी ४३ लाख ५८ हजार निधी मंजूर करण्यात आला असल्याचे श्री. खिलारी यांनी सांगितले.