नाना पाटेकर : सरकारकडे मागू नका, कुठलं सरकार आणायचं ते ठरवा…

Photo of author

By Sandhya

नाना पाटेकर

आई सांगायची, सोने १६ रुपये तोळा होते. आता ते ५० हजार रुपयांवर पोचले. सोन्याचा भाव वाढला मग आमच्या गहू-तांदळाचा भाव का वाढत नाही. शेतमालाला रास्तभाव हवा. पण प्रत्येक गोष्ट सरकारकडे मागून मिळत नाही. त्यामुळे सरकारकडे मागू नका. कुठलं सरकार आणायचं ते ठरवा, अशी रोखठोक भूमिका सिनेअभिनेते व नाम फाउंडेशनचे प्रमुख नाना पाटेकर यांनी मांडली. 

शेती अर्थ प्रबोधिनीद्वारा आयोजित ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन ४ व ५ मार्चला मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्म परिसरात युगात्मा शरद जोशी विद्यानगरी येथे केले आहे.

संमेलनाच्या उद्‌घाटन सत्रात उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष भानू काळे, म. रा. साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोज काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप, रामचंद्रबापू पाटील, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष व सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, संयोजक सतीश बोरूळकर आदी उपस्थित होते.

पाटेकर म्हणाले, की आम्ही फक्त नावापुरते स्वतंत्र झालो आहोत. शेतकऱ्याची गुलामी संपायला तयार नाही. त्या गुलामगिरीच्या विरोधात लिहा. शेतकरी कधीही कुणाची अडवणूक करत नाही. त्यास जनावरांची भाषा कळते. मात्र सरकारला शेतकऱ्यांची भाषा कळत नाही. त्याविरोधात लिहिता यायला हवे. गोंजारणारे दुःख मांडू नका.

आपल्या धमन्यांत वाहणारी वेदना रसरशीतपणे मांडा, असे आवाहन त्यांनी साहित्यकांना केले. ‘जगावं की मरावं’ हा एकच प्रश्‍न असला तरी जगलेच पाहिजे. चांगले दिवस येतील, अन्यथा आपण ते आणू, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. शिंदे म्हणाले, की शरद जोशी यांनी मांडलेल्या चतुरंग शेतीच्या कल्पना या केवळ पुस्तकी नाहीत.

त्याचा आधार घेऊन आम्ही चालण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरद जोशींची ही संकल्पना भारतीय शेतीचे भवितव्य उजळवणारी आहे. मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले, शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठी मायभाषा गौरवगीत व शेतकरी गीत सादर केले. गंगाधर मुटे यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद राजेभोसले यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Comment