विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाला आहे. मविआची मते फुटल्याने महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आले आहेत. तर मविआचे २ उमेदवार जिंकले आहेत.
मविआकडे मतांची बेगमी नसताना उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी का दिली याचा आतील राजकारण बाहेर येईलच परंतू ज्या काँग्रेसची मते फुटली त्याच्या प्रदेशाध्यक्षांनी फुटीर आमदारांना बदमाश म्हटले आहे. तसेच गेल्यावेळी ते सुटले होते, आता सापळा रचून त्यांना पकडण्यात आल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे ते फुटीर आमदार कोण, ज्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि भाजपाला मतदान केले, याची यादी पटोले यांनी दिल्लीला पाठविली आहे. तसेच या लोकांवर कारवाई करणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या निवडणुकीवेळी काही बदमाशांनी बदमाशी केली होती. तेव्हा ते सापडू शकले नव्हते. आता त्यांना पकडण्यासाठी सापळा लावला होता, त्यात ते सापडले आहेत, असे पटोले म्हणाले.
जयंत पाटील यांना शरद पवार गटाची १२ मते पडली आहेत. नार्वेकरांना ठाकरे गटाची १५ आणि उर्वरित काँग्रेसची जादाची मते मिळाली आहेत. त्यांना प्रथम पसंतीची काँग्रेसची ७ मते मिळाली आहेत.
उर्वरित मते सत्ताधारी महायुतीला गेली आहेत. यावर तोंडसुख घेताना शरद पवार गटाचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसने २४ ते ४८ तासांत या आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
अशी फुटली मते…महाविकास आघाडीकडे ६९ मते होती. यात काँग्रेस – ३७, उद्धव सेना – १५, शरद पवार गट – १२, शेकाप – १, समाजवादी पार्टी २, माकप – १ आणि अपक्ष १ यांचा समावेश होता. मात्र मविआच्या रिंगणात असलेल्या प्रज्ञा सातव (काँग्रेस), मिलिंद नार्वेकर (उद्धव सेना) व जयंत पाटील (शेकाप) या तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५९ तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना २५ मते मिळाली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने सातव यांना पहिल्या पसंतीची २८ मते देण्याचे निश्चित केले होते. म्हणजे सातव यांना मतदान करण्यास सांगण्यात आलेल्या काँग्रेसच्या २८ आमदारांपैकी ३ आमदारांनी त्यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे स्पष्ट आहे.