नाना पटोले : गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा…

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

‘‘राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर असताना दारू आणि अमली पदार्थांचे सेवन करून सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले.

पुण्याच्या प्रकरणात असाच राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसून आल्याने राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाही. पुण्याच्या अपघात प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’मार्फत करावी, तसेच गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. ‘‘पुण्यात गर्भश्रीमंत व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने मोटारीखाली दोघांना चिरडले. त्याच्याबरोबर एका आमदाराचा मुलगाही होता.

तो कोण हे समजले पाहिजे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वकिलीचा वापर आरोपींना वाचवण्यासाठी केला. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ महाराष्ट्रात आणून तरुण पिढीला बरबाद करण्याचे पाप भाजपने केले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर खुलासा करावा.

फडणवीस यांची भूमिका संशयास्पद वाटते, त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा.’’ ‘‘गृहमंत्र्यांच्या नागपूर शहरातही दोन मुलींनी दोन युवकांना गाडीखाली चिरडून मारले. तरीही त्यांना दहा तासांत जामीन मिळाला. जळगावातही एकाला गाडीखाली चिरडण्यात आले व त्यातही आरोपीला वाचविण्याचे प्रयत्न झाला.

पुण्याच्या ससून रुग्णालयामधील डॉ. तावरे यांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. डॉ. तावरे यांना अधीक्षक पदासाठी नियुक्त करावे यासाठी एक मंत्री व आमदार यांनी शिफारस केली होती. तो मंत्री व आमदार कोण हे जनतेला समजले पाहिजे,’’ असे पटोले म्हणाले.

अधिकारी, लोकप्रतिनिधींनी इमान विकले ‘‘पुण्यात घडलेल्या अग्रवाल प्रकरणात रोजच नव्या बाबी समोर येत आहेत. एका बड्या बापाच्या मुलाला वाचवायला कित्येक अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी त्यांचे इमान त्या रात्री विकले,’’ असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

डॉ. अजय तावरे यांना ससूनचे वैद्यकीय अधीक्षकपद देण्याची शिफारस करणारे व त्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा शेरा असलेले आमदार सुनील टिंगरे यांचे पत्र आव्हाड यांनी पोस्ट केले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, आरोपीचे रक्ताचे नमुने डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हरणोर यांनी चक्क कचऱ्यात फेकले. इतकेच नाही तर याचा अहवाल द्यायला ४-५ दिवस लावले. एरवी दोन तासांत मिळणाऱ्या या अहवालाला इतका वेळ का लागत असावा, असा सवाल आव्हाड यांनी केला.

Leave a Comment