सुप्रिया सुळे : “पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”

Photo of author

By Sandhya

सुप्रिया सुळें

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालसहित कुटुंबाची कुंडली बाहेर काढली आहे. तर ससूनमधील डॉक्टरही या प्रकरणात फेरफार करण्यासाठी पैसे घेतल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी एक्सवर एक पोस्ट करत गृह विभागाचे अपयश अधोरेखित झाल्याची टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कुणाचाही सहभाग असल्यास या प्रकरणात त्यांना ही आरोपी करा.

समाजात या प्रकरणाच्या माध्यमातून चांगला संदेश जायला हवा असे मुख्यमंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करा अशा सूचनाही आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री लवकरच पुण्यात अपघात झालेल्या घटनास्थळी पाहणी करणार असल्ल्याचे सूत्रांकडून समजले आहे. तसेच या प्रकरणाबाबत पोलीस आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

पुणे पोर्शे कार प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अपयश अधोरेखित पुणे शहरात देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. याखेरीज आयटी उद्योगामुळे देशभरातील अभियंते येथे काम करीत आहेत. शिवाय विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकही पुण्याला आपली पसंती देतात. पुणे हे शहर कला आणि सांस्कृतिक घडामोडींच्या दृष्टीने देखील जगभरात प्रसिद्ध आहे.

‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शांतताप्रिय पुण्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे शहराच्या एकंदर प्रतिमेला तडा जात आहे. शहरात ड्रग्ज आणि गांजासारखे अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचे दिसते.येथे कोयता गँग आणि इतर गुन्हेगारीने उच्छाद मांडला असून कल्याणीनगर ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर शहरातील कायदे आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

स्वतः गृहमंत्र्यांना शहरात ठाण मांडून बसावे लागले ही बाबच परिस्थितीचे गांभीर्य पटवून देण्यास तसेच शासन आणि गृहमंत्र्यांचे कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यातील अपयश अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे. गृहमंत्री महोदयांचे पुण्यासारख्या महत्वाच्या शहराकडे लक्ष नाही. त्यामुळे येथे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याचा सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे.

यासोबतच शहरातील सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. राज्याच्या गृहखात्याने अजूनही वेळ न घालविता शहराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. गृहखात्याने येथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावे आणि नागरिकांना विश्वास द्यावा, हे सद्यस्थितीत अतिशय महत्वाचे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विशाल अग्रवाल याच्या घरावर छापेमारी केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल १०० पेक्षा अधिक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासण्यात आले आहेत.

कल्याणी नगर अपघातात दररोज मोठमोठे खुलासे होत असताना, सीसीटीव्ही फुटेजमुळे अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच पोलिसांना मिळाली आहे. ससूनच्या प्रकरणानंतर बाप – लेकाच्या पोलीस कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. बाळाला ४ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment