नाना पटोले : जे झाले ते बरोबर नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सांगलीच्या जागेवरून नाराजी

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत. या जागांवर काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. त्यामुळे सांगलीवरुन जे झाले ते बरोबर नाही, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर नाराजी व्यक्त केली.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षांनीही तो प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहनही पटोले यांनी केले.

महाविकास आघाडीत सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून वाद होता. मात्र, या दोन्ही जागा अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाकडे गेल्या आहेत. यावरून काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी आहे.

सांगलीची जागा पक्षानेच लढावी, यासाठी काँग्रेस नेत्यांवर कार्यकर्त्यांचा दबाव आहे. काँग्रेसचे सांगलीतील नेते विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा काँग्रेस लढवेल, असे जाहीर केले होते. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत.

त्यामुळे काँग्रेस पक्ष सांगलीची जागा सोडायला तयार नव्हता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे काँग्रेसला सांगलीची जागा गमवावी लागली आहे. तसेच शरद पवार गटानेही भिवंडीची जागा पदरात पाडून घेतल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मित्र पक्षांवर नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले,‘‘महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही. त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. देशाचे संविधान आणि लोकशाही टिकवणे हे सर्वांचे काम आहे.

आताची निवडणूक ही देश वाचविण्यासाठी आहे. भाजपचा पराभव करणे हाच मुख्य उद्देश आहे. महाविकास आघाडी या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव करेल.

मागील १० वर्षांत भाजपने खोटी आश्वासने देऊन देशाला बरबाद केले, त्याचा उगम हा नागपूरच आहे.’’असेही त्यांनी सांगितले. ‘‘नागपूरमध्ये भाजपचा उमेदवार कोण आहे हे महत्त्वाचे नाही, ही लढाई विचाराची आहे.

विकासाच्या नावाखाली नागपूरचे बेहाल करून ठेवले आहेत. नेमका कोणाचा विकास झाला, कुठे गेले मिहान? मालवाहतूक करणारी विमाने येथे उतरतील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, या आश्वासनांचे काय झाले,’’ असा सवाल करत पटोले यांनी स्थानिक तसेच राष्ट्रीय मुद्यांवरही या निवडणुकीत भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले आहे. देशावर कर्जाचा मोठा डोंगर करून ठेवला आहे. जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे मोदी सरकारला धडा शिकविल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही.

Leave a Comment

You cannot copy content of this page