नाना पटोलेंची महायुती सरकारवर टीका ; मलाईच्या वाटणीत गडबड…

Photo of author

By Sandhya

नाना पटोलेंची महायुती सरकारवर टीका

 राज्यातील साखर कारखाने हे मलई मिळण्याचाच एक भाग आहे. तेथे मलई जास्त मिळते, त्यामुळे मलाईच्या वाटणीत गडबड झाला, असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री कमी, पण देवेंद्र फडणवीस हेच खरे सुपर मुख्यमंत्री आहेत हे कालच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

इंडिया आघाडीची बैठक सुरु होण्यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी टिळक भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला.

राज्य सरकारमधील धोरणात्मक निर्णयांच्या फाईल्स उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिल्यानंतर त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहेत.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतिम निर्णय घेतील, असा आदेश काढत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना चाप लावल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात विचारले असता पटोले म्हणाले, अजित पवारांचा स्वभाव महाराष्ट्राला आणि शासनकर्त्यांना माहित आहे.

अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे दादागिरी काय असते हे महाविकास आघाडी सरकारमध्ये पाहिलेली आहे. शिंदे गट जेव्हा वेगळा झाला तेव्हा या गटाचा आरोपच अजित पवारांवर होता. आता ज्यांनी आरोप केला त्यांच्याच सरकारमध्ये अजितदादा अर्थमंत्री झाले.

त्याप्रमाणे त्यांनी कारवाई सुरु केली असेल, हे काही नवीन नाही. कारण साखर कारखाने हे मलाईचाच विषय आहे. मलाईच्या वाटणीत काही गडबडी झाल्यात, असा आरोप करत एखादा चेहरा समोर ठेवायचा आणि भाजपचा सत्तेचा उपभोग घेण्याचा कालच्या निर्णयाने स्पष्ट झाला आहे, असेही ते पुढे म्हणाले.

Leave a Comment