छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे शाहूनगरीत शुक्रवार, दि. 19 रोजी दाखल होत आहेत. या ऐतिहासिक घटनेचे स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज असून, हा सोहळा अत्यंत दिमाखदार व राजेशाही थाटात व्हावा, यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ही शाहूनगरीत येत असल्याने त्यांच्या स्वागताच्या नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
या बैठकीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व इतर प्रमुख अधिकार्यांसह छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची पाहणी करुन प्रशासनाला सूचना केल्या.
ना. देसाई म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र वाघनखं येत्या दि. 19 जुलैपासून सातार्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शित केली जाणार असून जनतेला त्याचे दर्शन घेता येईल. या वाघनखांच्या स्वागताचा दिमाखदार सोहळा आयोजित केला आहे.
एकूण सात महिने ही वाघनखं शिवाजी महाराज संग्रहालयात असणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला या वाघनखांचे दर्शन घेण्याची संधी मिळावी यासाठी नेटके नियोजन प्रशासनाने केले आहे.
वाघनखांच्या स्वागत सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या स्वागत सोहळ्यासाठी संपूर्ण शहर व जिल्हाभर स्वागत कमानी उभारण्यात येऊन बॅनर्स, पोस्टर्स, संग्रहालयाभोवतालची अतिक्रमणे काढून स्वच्छता करावी. संग्रहालयाची सजावट, विद्युत रोषणाईवरही विशेष भर देण्यात येणार आहे.