राज्यात तीन पक्षांची आघाडी तयार झाल्याने मला आता कोणताही मतदार संघच उरलेला नाही अशी खंत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
कोणतीही निवडणूक जाहीर झाली की, आपल्या नावाची चर्चा केली जाते आणि लोकांना वाटते की त्यापदावर माझी वर्णी लागेल. पण हे लोकांचे प्रेम आहे असे त्यांनी म्हटले आहे.
अलिकडेच पंकजा मुंडे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. ती चर्चा राज्यसभेच्या अनुषंगाने झाली असावी असे सांगितले जात होते पण त्याचा फडणवीस यांनीच इन्कार केला आहे.
त्यामुळे आता पंकजा यांच्या रणनितीविषयी औत्स्युक्य आहे. त्या सध्या गाव चलो अभियाना अंतर्गत बीड जिल्ह्यांच्या गावांचा दौरा करीत आहेत. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात जाहीर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत माझ्या नावाची चर्चा झाली. लोकांना वाटते की मी अनेक वर्षांपासून पदाची वाट पाहत आहे,
त्यामुळे त्यांनी माझे नाव घेणे स्वाभाविक आहे, असे त्या एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाल्या. महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आल्याने माझ्यासाठी एकही मतदारसंघ उरलेला नाही.
त्यामुळे अशा चर्चा होतात,अशी पुष्टीही त्यांनी जोडली. आता तुम्ही ललोकसभेला किंवा राज्यसभेला उत्सुक आहात काय असे विचारता त्या म्हणाल्या की लोकांना मी कुठे असलेली आवडेल हे महत्वाचे आहे.
बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा चुलत भाऊ आणि सध्या राज्यात मंत्री असलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला.