राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी मी निवडणूक लढवावी अशी विनंती केली होती. भाजपाने सुद्धा आपण स्वतः निवडणूक लढवत असाल तर विचार करता येईल असे सांगितले.
मात्र राज्यसभेवर नियुक्ती झाल्याने मी 2030 पर्यंत खासदार आहे, त्यामुळे निवडणूक लढवत नाही,’ असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना दिले.
भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक दिवसांपासून तिढा कायम होता. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचार, जाहीर सभांना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पटेल यांनी खुलासा केला आहे.
‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गोंदिया येथे सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना निवडून आणण्यासाठी सर्व पक्ष एकवटले आहेत. निश्चितपणे आमचा उमेदवार विजयी होईल,’ असा दावा खासदार पटेल यांनी केला.
पटेल पुढे म्हणाले की, अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण हा न्यायिक प्रक्रियेचा भाग होता. न्यायपालिकेवर भाष्य करणे योग्य नाही. न्याय प्रक्रिया सर्व तथ्य तपासून निर्णय देत असते. न्यायालयाकडूनच राणा यांना दिलासा मिळाला आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.
‘सगळ्या जागेवर आम्ही चर्चा करून समाधान पूर्वक विचार केला आहे. त्यामुळे सर्व चर्चा आणि वाटाघाटी करून आम्ही जागावाटप केले. नाशिकच्या जागेबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल,’ असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना लोकशाहीत त्यांनी आंदोलन केले तर त्यात गैर काहीच नाही. महायुती सरकार आणि मोदी सरकार योग्य प्रकारे काम करत आहे. ज्यावेळी त्यांची सत्ता होती त्यावेळी त्यांनी हे प्रश्न का सोडवले नाही? असा सवाल प्रफुल पटेल यांनी उपस्थित केला.