प्रकाश आंबेडकर : ‘मनोज जरांगे यांनी राजकारणात एन्ट्री करावी’…

Photo of author

By Sandhya

प्रकाश आंबेडकर

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील मुंबईकडे उद्या 20 जानेवारीपासून कूच करणार आहे. त्यावेळेसच्या आंदोलनासाठी जरांगे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरु केले आहे.

आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी मुंबईला पायी प्रवासाची तयारी करावी, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी निर्णायक लढा पुकारला असून, अंतरवाली सराटीतून उद्या सकाळी 9 वाजता मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं आहे. लोकसभा निवडणुकीत जिंकून मराठा आरक्षणासाठी चांगला लढा देता येईल, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं आहे.

यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेली 35 वर्षे चाललेला आहे.

पण इथल्या श्रीमंत मराठ्याने त्याला कधीही स्वरुप आणि आकार दिलेला नाही. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरुपही आलं आणि एक आकारही आला. त्याचबरोबर एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आहे,

ज्याला समाजामध्ये सहानुभूती असणारी परिस्थिती आहे. तेव्हा गरीब मराठ्याच्या आरक्षणाचं वेगळं ताट निर्माण करायचं असेल तर जरांगे पाटील यांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेबाबत त्यांनी भूमिका घेतली पाहिजे.

असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. त्यामुळे आगामी काळात मनोज जरांगे खरंच राजकारणात एन्ट्री मारतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. असा असणार मुंबईला जाण्याचा मार्ग :

20 जानेवारी पहिला मुक्काम – बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात. (बीड) 21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर) 22 जानेवारी तिसरा मुक्काम – रांजणगाव (पुणे जिल्हा) 23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे) 24 जानेवारी पाचवा मुक्काम – (लोणावळा) 25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई) 26 जानेवारी 7 वा मुक्काम – आझाद मैदान आंदोलन स्थळी

Leave a Comment