प्रवीण दरेकर : “मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता”

Photo of author

By Sandhya

प्रवीण दरेकर

शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला आहे. गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहे. मात्र मुलाच्याविरोधात रवींद्र वायकर हे मैदानात आहेत.

निवडणुका जाहीर झाल्यापासून गजानन कीर्तिकर यांनी रवींद्र वायकर यांचा प्रचार केला, तर दुसरीकडे आपल्या मुलाच्या विरोधातच प्रचार करण्याची त्यांच्यावर वेळ आली. शिंदे गटात गेल्यामुळे मी कुटुंबात एकटा पडलो, असल्याचे विधान त्यांनी केले.

त्यानंतर गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी केली होती. यानंतर आता भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी किर्तीकरांवर गंभीर आरोप केले आहेत.

“अमोल कीर्तिकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता, हा माझा जाहीर आरोप आहे. एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तिकरांसमोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील आणि दुसरा कोणीही उमेदवार नसेल.

नंतर गजानन कीर्तिकर उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचे, हा गजानन कीर्तिकरांचा पूर्वनियोजित कट होता,” असा आरोप दरेकर यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, “गजानन कीर्तिकर शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना पक्षात चांगली वागणूक दिली. पण गजानन किर्तीकर यांचा उद्देश संशयास्पद होता. हे आता हळूहळू बाहेर येत असल्याचा दावा देखील भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केला. यावर गजानन किर्तीकरांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

अमोलने निवडणूक लढविण्याचे आधीच जाहीर केले होते. तसेच तो शिंदे गटाकडून लढण्यास तयार नव्हता. तसेच माझे निवृत्तीचे वय झाले होते व मुलाविरोधात लढणे योग्य नसल्याने मी लढणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते, असा खुलासा किर्तीकर यांनी केला आहे.

शेवटी हा घरगुती प्रश्न आहे. गजानन कीर्तिकर यांनी उघडपणे प्रचार केला नाही पण ते शांत बसले होते. पण हे वाद जे होत आहे त्यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री आणि गजानन कीर्तीकर यांनी एकत्र बसून हा वाद मिटवावा, असा सल्ला शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.

Leave a Comment