सांगली मतदारसंघात माझ्या नावाने खडे फोडले जात आहेत; मात्र सध्याच्या अपक्ष उमेदवाराच्या नावाची मी स्वतः शिफारस केली होती. शिवसेनेच्या कोल्हापूर, हातकणंगले या जागा शाहू महाराज व राजू शेट्टी यांना देणार असल्याने त्यांनी त्यांचा उमेदवार परस्पर जाहीर केला, असा खुलासा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांचा नामोल्लेख टाळत इस्लामपूर येथे केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या आभार सभेत ते बोलत होते. याप्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील,सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंग नाईक, युवानेते प्रतीक पाटील,युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, विजयराव पाटील,शहाजी पाटील,देवराज पाटील,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, शकील सय्यद, काँग्रेसचे राजेंद्र शिंदे उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील म्हणाले, “हा मतदारसंघ राजू शेट्टी यांना सोडण्याची शिफारस आम्ही केली होती. ते उध्दवजी ठाकरे यांना दोनदा भेटूनही आले होते. मात्र त्यानंतर चित्र वेगळे झाले. आम्ही सत्यजित पाटील यांच्या नावाची शिफारस केली.
उध्दव ठाकरे यांनी त्यांना बोलावून त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी आमदार बंटी पाटील यांच्याकडे आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त करून पत्राचा मसुदाही दिला.
मात्र त्यानंतर उध्दवजी ठाकरे यांनी आपला निर्णय कायम ठेवला. सांगली मतदारसंघात सध्याचे जे अपक्ष उमेदवार आहेत, त्यांच्या नावाची मी शिफारस केली होती.
मात्र शिवसेनेच्या कोल्हापूर, हातकणंगले या जागा छ.शाहू महाराज व राजू शेट्टी यांना देणार असल्याने त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला. भाजपा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३७ टक्के मते घेऊन देशाच्या सत्तेत आले होते. मात्र या निवडणुकीत ते ३२-३३ टक्क्यांपर्यंत खाली आल्यास ते देशातील सत्तेतून जाऊ शकतात.
राज्यातील ४८ जागामध्ये भाजपास १२-१५ पेक्षा जादा जागा मिळणार नाहीत, असे आजचे चित्र आहे. आता विधानसभेची निवडणूक आहे. ताकदीने कामाला लागा. मतदार याद्यावर लक्ष ठेवा. बुथच्या कामास अधिक गतिमान करा.” आमदार मानसिंग नाईक म्हणाले, “सत्यजित पाटील यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या विजयात आपले कष्ट,योगदान मोलाचे ठरले आहे.
जयंत पाटील यांनी राज्यात १०० पेक्षा जादा सभा घेतल्या, मात्र त्यांनी आपणास पूर्ण वेळ दिला आहे. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था,विधानसभा निवडणूका आहेत. आपण सर्वांनी योग्य समन्वय व लोकांशी सुसंवाद-संपर्क ठेवत या निवडणुकांना सामोरे जाऊया.” सत्यजित पाटील म्हणाले, “मला खासदार म्हणून संधी मिळाल्यास आपणास पश्चाताप होणार नाही.
विरोधकांच्या पैशाचा आपल्या मतदारसंघात परिणाम होणार नाही.” शिवसेनचे अभिजित पाटील, शकील सय्यद,काँग्रेस पक्षाचे कॉ.धनाजी गुरव,महिला राष्ट्रवादीच्या सुस्मिता जाधव,बी.के. पाटील,संग्राम फडतरे,देवराज देशमुख, पुष्पलता खरात यांची भाषणे झाली.
शहाजी पाटील यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा.कृष्णा मंडले यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी आभार मानले. प्रा.शामराव पाटील,नेताजीराव पाटील,विनायक पाटील,खंडेराव जाधव,सुभाषराव सुर्यवंशी,अँड.धैर्यशिल पाटील, संदीप पाटील, कमल पाटील,काँग्रेसचे अँड.आर. आर.पाटील उपस्थित होते.
प्रतीक यांच्या प्रचारयंत्रणेचे कौतुक आमदार जयंत पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी राज्यात १०४ सभा घेतल्या. प्रतीक पाटील यांनी शिलेदारांना सोबत घेऊन इस्लामपूर मतदारसंघ पिंजून काढला. संपूर्ण प्रचार यंत्रणा हाताळली. याबाबत सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात त्याबाबत कौतुक केले.